Rahul Gandhi America Tour: काँग्रेसचे नेते राहुल गांधीअमेरिका दौऱ्यावर जाणार आहे. अमेरिका दौऱ्यावर असताना राहुल गांधी अनेकविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. अलीकडेच केंब्रिज विद्यापीठातील कार्यक्रमात राहुल गांधी यांनी केलेल्या विधानांवरून देशभरात बरेच आरोप-प्रत्यारोप झाले होते. आता राहुल गांधी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, या ठिकाणी राहुल गांधी काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जून रोजी अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबत २२ जून रोजी पंतप्रधान मोदींची भेट होऊ शकते, असे व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिवांकडून सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याची गेल्या काही काळापासून चर्चा सुरू होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान मोदींना या भेटीसाठी आमंत्रित केले होते. यानंतर आता पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत.
PM मोदींच्या आधी राहुल गांधी अमेरिकेला जाणार
२८ मे रोजी राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एका कार्यक्रमात राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. यानंतर २९ आणि ३० मे रोजी राहुल गांधी अनिवासी भारतीयांना भेटून संवाद साधणार आहेत. काही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी राहुल गांधी १० दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार होते. ३१ मे रोजी राहुल गांधी रवाना होणार होते. न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये सुमारे ५ हजार अनिवासी भारतीयांच्या रॅलीत राहुल गांधी सहभागी होणार होते. स्टॅनफोर्ड विद्यापीठात पॅनेल चर्चेत सहभाग घेणार होते. वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्नियालाही जाणार होते. याशिवाय राजकीय नेते आणि उद्योजकांना भेटणार होते, असे सांगितले गेले होते.
दरम्यान, राहुल गांधींचा मार्च २०२३ मध्ये झालेला लंडन दौरा चांगलाच गाजला होता. केंब्रिज विद्यापीठातील राहुल गांधींच्या भाषणाची खूप चर्चा झाली. राहुल गांधींनी लंडनमधील पत्रकार संघ आणि लंडनमधील थिंक टँक यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातही सहभाग घेतला होता.