नवी दिल्ली - काँग्रेसने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. तत्पूर्वी काँग्रेसकडून राजीव शुक्ला यांना राज्यसभेच्या उमेदवारीसाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र शुक्ला यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला.
राजीव शुक्ला यांनी गुरुवारी राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भात विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी संघटनात व्यस्त असल्याचे सांगत उमेदवारी घेण्यास नकार दिला. तसेच उमेदवारीची विचारणा झाल्यानंतर शुक्ला यांनी ट्विट करून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे आभार मानले.
ट्विटमध्ये शुक्ला म्हणाले की, मला राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भात विचारल्याबद्दल मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आभारी आहे. त्यांनी गुजरातमधून राज्यसभेच्या उमेदवारीचा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला होता. मात्र मी सध्या पक्ष संघटनात व्यस्त आहे. त्यामुळे आपल्या जागी दुसऱ्या कुणाला उमेदवारी देण्याचा आपण आग्रह केला आहे.
राजीव शुक्ला यांनी उमेदवारी नाकारल्याच्या ट्विटनंतर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून राजीव शुक्ला यांनी पक्ष संघटनेसाठी उमेदवारी नाकारल्याबद्दल कौतुक करण्यात आले आहे. तुमच्या सारखे नेते कार्यकर्त्यांना पक्षाविषयीची प्रतिबद्धता आणि विचारधारेविषयी प्रेरीत करतात. तुमचे काम पक्षाचे संघटन मजबूत करणारे असल्याचे काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरून म्हटले आहे.