नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राजकीय पक्षांच्या प्रचार सभांचा जोर वाढला आहे. यातच नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपा नेत्या आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणदीप सुरजेवाला हे हेमा मालिनी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपा नेत्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. कंगना राणौतनेही या व्हिडिओवरून काँग्रेसवर हल्लाबोल केला. रणदीप सुरजेवाला यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करताना कंगना रणौत हिने म्हटले आहे की, तुमचे नेते तर मोहब्बत की दुकान उघडणार म्हणत होते. आता तुम्ही द्वेष आणि तिरस्काराचं दुकान उघडलं आहे. महिलांबद्दल निकृष्ट दृष्टीकोन असलेले काँग्रेस नेते अपरिहार्य पराभवाच्या निराशेने दिवसेंदिवस चारित्र्य बिघडवत आहेत.
भाजपाचे आयटी विभाग प्रमुख अमित मालवीय यांनीही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी हेमा मालिनी यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केली आहे. त्यांची ही टिप्पणी केवळ हेमा मालिनी यांच्यासाठीच नाही, तर सर्वसामान्य महिलांसाठीही अपमानास्पद आहे, असे अमित मालवीय यांनी म्हटले आहे. तसेच, यावरून प्रमुख विरोधी पक्ष महिलांचा द्वेष करत असल्याचे दिसून येते, असा आरोप भाजपाने केला आहे.
याबाबत हेमा मालिनी म्हणाल्या की, त्यांना (सुरजेवाला) जी काही टिप्पणी करायची आहे, ती करू द्या. जनता माझ्यासोबत आहे. त्यांनी टिप्पणी केली तर काय होईल? मला काही फरक पडत नाही. विरोधकांचे काम आरोप करणं आहे. ते मला चांगल्या गोष्टी सांगणार नाहीत. तसेच, ते जे काही बोलले आहेत, त्यामुळे मला काही फरक पडत नाही. मी माझे काम केले आहे, असे हेमा मालिनी यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला 1 एप्रिल रोजी हरियाणाच्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघातील कैथल येथील एका गावात इंडिया आघाडीचे उमेदवार सुशील गुप्ता यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करत होते. यादरम्यान, भाजपा नेत्या आणि मथुरेच्या खासदार हेमा मालिनी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करताना रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले की, आमदार-खासदार का बनवले जातात? जेणेकरून ते जनतेचा आवाज उठवू शकतील.