संभल:काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरुन वाद सुरू आहे. यातच आता काँग्रेसचे आणखी एक नेते रशीद अल्वी यांच्या वक्तव्यावरुन नवीन वादाला तोंड फुटले आहे. अल्वी उत्तर प्रदेशातील संभल येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी श्रीरामाच्या नावावरुन भाजपवर निशाणा साधला. रामायणाचा एक प्रसंग सांगताना त्यांनी 'जय श्री राम' म्हणणाऱ्यांची तुलना राक्षसाशी केली. अल्वी म्हणाले, 'जय श्री रामचा जप करणारे सर्व ऋषी नाहीत, ते राक्षस आहेत. आपल्याला सावध राहण्याची गरज आहे.'
आपल्या भाषणादरम्यान रशीद अल्वींनी भाजपच्या काही लोकांकडे बोट दाखवत जय श्री रामचा नारा देणाऱ्यांची तुलना रामायणातील कालनेमी राक्षसाशी केली. ते म्हणाले की, लक्ष्मण जेव्हा बेशुद्ध पडले होते, तेव्हा वैद्याच्या सांगण्यावरुन हनुमान हिमालयातून संजीवनी औषध आणण्यासाठी जात होते. त्यावेळी जमीनीवरुन राक्षस जय श्री रामचा जयघोष देत होते. हे ऐकून हनुमानजी खाली आले. हनुमानाचा मौल्यवान वेळ वाया घालवण्यासाठी त्या राक्षसाने हनुमानाला स्नान करायला पाठवले होते. त्या राक्षसाप्रमाणे काही लोक आजही भगवान श्रीरामाचे नामस्मरण करत आहेत, असे रशीद म्हणाले.
भाजपकडून व्हिडिओ शेअररशीद पुढे म्हणाले की, आम्हालाही देशात रामराज्य हवे आहे, पण ज्या राज्यात बकरी आणि सिंह एकाच घाटावर पाणी पितात, तेथे द्वेष कसा असू शकतो ? जय श्री रामचा जयघोष करुन लोकांची दिशाभूल करणाऱ्यांपासून इतरांनी सावध राहावे. अल्वी यांच्या या वक्तव्यावर भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी अल्वी यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ शेअर केला असून सलमान खुर्शीद यांच्यानंतर आता रशीद अल्वी जय श्री राम म्हणणाऱ्यांना निशाचर(राक्षस) म्हणत आहेत, असे मालविया म्हणाले.
सलमान खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना इसिसशी केलीअल्वी यांच्या विधानापूर्वी काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या 'सनराईज ओव्हर अयोध्या' या पुस्तकावरुन गदारोळ सुरू आहे. खुर्शीद यांनी या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना 'इसिस' आणि 'बोको हराम' या दहशतवादी संघटनांशी केली आहे. खुर्शीद यांचे पुस्तक बुधवारी लाँच करण्यात आले आणि 24 तासांत त्यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी विवेक गर्ग नावाच्या वकिलाने दिल्ली पोलिस आयुक्तांकडे गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे. खुर्शीद यांच्यावर हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तर, हे सोनिया आणि राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावर होत असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.