जबलपूर - औरंगजेबाची कबर हटवण्यावरून महाराष्ट्रात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या कबरीला मिळणाऱ्या संरक्षणावरून महाराष्ट्र विधानसभेतही मुद्दा चर्चेत आला. मात्र त्यातच जबलपूर येथील काँग्रेसच्या स्थानिक महिला नेत्याने सोशल मीडियात केलेल्या विधानावरून नवा वाद उभा राहिला. भगवान परशुराम यांची तुलना औरंगजेबाची करून या नेत्या चांगल्याच गोत्यात आल्या. त्यांच्या विधानावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. पक्षानेही त्याची गंभीर दखल घेत नोटीस पाठवली. त्यानंतर संबंधित महिला नेत्याने जाहीरपणे माफी मागितली आहे.
औरंगजेबाची केली परशुरामाची तुलना
माजी महिला शहर अध्यक्षा रेखा विनोद जैन यांनी सोशल मीडियावर कथाकार मणिका मोहिनीशी पोस्ट शेअर करत लिहिलं होतं की, औरंगजेबाने त्याच्या भावाचे शीर कापून वडिलांना भेट दिले होते. परशुरामाने आपल्या आईचं शीर कापून वडिलांना भेट दिले होते. माझ्या मते, हे दोन्ही क्रूर आहेत. परंतु हिंदुत्वाचा आजार जास्त धोकादायक आहे. कारण ते परशुरामाचा अवतार मानतात. ते धर्माचे प्रतिक मानतात. त्यांना केवळ ब्राह्मणांचे नव्हे तर हिंदूचेही प्रमुख मानतात असं त्यांनी म्हटलं.
वाद उफाळताच घेतला यु टर्न
सोशल मीडियावरील या पोस्टनंतर वाढता वाद पाहता काँग्रेसच्या महिला नेत्याने ती पोस्ट डिलीट केली. १२ मार्चला ही पोस्ट त्यांच्याकडून चुकून टाकण्यात आली होती. कुणीतरी मला ती पोस्ट पाठवली होती. दुसऱ्या दिवशी माझ्या लक्षात आले की, चुकून टाकलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. मी तात्काळ ती काढून टाकली. ही माझ्याकडून झालेली चूक आहे त्यासाठी मी जाहीरपणे माफी मागते. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. पक्षानेही मला याबाबत नोटीस पाठवली असून मी त्यांना माझे म्हणणं दिले आहे असं रेखा जैन यांनी सांगितले.
दरम्यान, रेखा जैन यांची पोस्ट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर ब्राह्मण समाजाने काँग्रेसच्या रेखा जैन यांचा तीव्र निषेध करत त्यांचा विरोध केला. चहुबाजुने काँग्रेसवर टीका होऊ लागल्यानंतर पक्षानेही या प्रकाराची गंभीर दखल घेत रेखा जैन यांना नोटीस पाठवून ४८ तासांत माफी मागण्याचे निर्देश दिले. ब्राह्मण समाजाचा विरोध आणि काँग्रेस पक्षाकडून मिळालेल्या नोटिशीनंतर रेखा जैन यांनी मवाळ भूमिका घेत माध्यमांसमोर येऊन या प्रकारावर माफी मागितली. मात्र रेखा जैन यांच्या विधानामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा खराब झाली असं पक्षातील नेते बोलत आहेत.