नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी आता कारवाईसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशमधील नोएडा पोलिसांनी प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचार प्रकरणी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्यासह अनेक ज्येष्ठ पत्रकारांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.यासंदर्भात सोशल मीडियावर एफआयआर क्रमांक ००७६ ची कॉपी व्हायरल होत आहे. शशी थरूर यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, मृणाल पांडेय, जफर आगा, परेशनाथ, अनंतनाथ आणि विनोद के. जोस यांच्यासोबत एका अज्ञात व्यक्तीचे नाव सामील आहे. या लोकांवर १५३ ए, १५३ बी, २९५ ए, २९८, ५०४, ५०६, ५०५ (२), १२४ अ, ३४, १२० ब आणि ६६ सारखी कलमे लावण्यात आली आहेत.केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान, शेतकरी आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. मात्र या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. तसेच काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर धडक देत हिंसाचार केला होता.
लाल किल्ला हिंसाचार : काँग्रेस नेते शशी थरूर, पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 12:09 AM