नवी दिल्ली: भारतात कोरोना महामारी (Corona)ची तिसरी लाट येणार, अशी अनेक तज्ज्ञांनी शक्यता वर्तवली आहे. या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशता लसीकरण(Corona Vaccination) अभियानही मोठ्या वेगानं सुरू आहे. आतापर्यंत देशभरातील 50 कोटींपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या या लसीकरण अभियानाचं आता काँग्रेस नेते शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी कौतुक केलं आहे.
काँग्रेस नेते शशी थरुर यापूर्वी केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या Cowin अॅपच्या टीकाकारांपैकी एक होते. पण, आता त्यांनी याचं कौतुक केलंय. थरुर यांनी ट्विट केलं, मी नेहमी केंद्र सरकारच्या चांगल्या कामाचं कौतुक करत असतो. मी सरकारच्या Cowin च्या टीकाकारांपैकी एक होतो, पण आता त्यांनी यात काहीतरी विशेष काम केले आहे. तुम्हाला आता या कोविन अॅपद्वारे थेट तुमच्या व्हॅट्सअॅपवर तुमचे लसीकरणाचे प्रमाणपत्र मिळेल. हे खूप सोपं आणि वेगवान आहे.
50 कोटी नागरिकांचं लसीकरणभारतात लसीकरण अभियान वेगानं सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच भारतानं 50 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलं होतं. ‘कोविड-19 विरोधात भारताने एक उंची गाठली आहे. आपण आता 50 कोटी लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. येणाऱ्या काळात उर्वरित सर्व नागरिकांना ‘सबको टीका, मुफ्त टीका’ कार्यक्रमांतर्गत लस देण्यात येईल,’असं मोदी म्हणाले होते.