नवी दिल्ली : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी डीसीजीआयने भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनला परवानगी देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत डीसीजीआयने स्पष्टीकरण दिले आहे.
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी अद्याप झालेली नाही. कोवॅक्सिनला अपत्कालीन मंजुरी देणे धोकादायक ठरू शकते. डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. कोरोना लसीचे ट्रायल पूर्ण होईपर्यंत याचा वापर करणे टाळले पाहिजे. भारतात सध्या अॅस्ट्रॅजेनेका लस वापरली पाहिजे."
याचबरोबर, भारत बायोटेकच्या लसीबाबत उद्भवणार्या प्रश्नांवर डीसीजीआयलाही स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. जोपर्यंत या लसीचा वापर करणारे लाभार्थी या लसीविषयी माहिती घेतल्यानंतर संमतीवर स्वाक्षरी करणार नाहीत, तोपर्यंत भारत बायोटेकच्या लसीला मंजुरी दिली जाणार नाही. लसीची जोपर्यंत चाचणी पूर्ण होत नाही तोपर्यंत तिला पूर्णपणे मंजुरी दिली जाणार नाही, असे डीसीजीआयच्यावतीने सांगण्यात आले आहेत.
दरम्यान, रविवारी डीसीजीआयचे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. सोबतच कॅडीलाच्या लसीला तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल करायलाही परवानगी देण्यात आली आहे. सीरम आणि भारत बायोटेकच्या या दोन्ही लसी 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवण्यात येऊ शकतात, असे डीसीजीआयने म्हटले आहे. तसेच, थोडा ताप, वेदना आणि अलर्जी असे परिणाम प्रत्येक लसींमध्ये असतात. या दोन्ही लसी ११० टक्के सुरक्षित आहेत, असे व्हीजी सोमाणी यांनी म्हटले आहे.