Rahul Gandhi Disqualification: काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ देशभरात काँग्रेसकडून संकल्प सत्याग्रहाचे आंदोलन करण्यात येत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीकाही केली जात आहे. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी, राहुल गांधी यांना न्यायालयाकडून सुनावण्यात आलेली २ वर्षांची शिक्षा म्हणजे आशेचा किरण असल्याचे म्हटले आहे.
मोदी आडनावावरून विधान केल्याने राहुल गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला होता. सुरत न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. तसेच जामीनही दिला. यावर बोलताना, मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना दोन वर्षांची झालेली शिक्षा हा आशेचा किरण आहे. त्यामुळे विरोधी पक्षांची अभूतपूर्व एकजूट झाली आहे. आम्ही प्रादेशिक पक्षांना प्रत्येक राज्यात काँग्रेसचा एक प्रतिस्पर्धी मानत आलो. मात्र, या परिस्थितीत ते सर्व पक्ष आमच्या बाजूने आहेत. दिल्लीत अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यापूर्वी कधीही काँग्रेससोबत नव्हते, मात्र आता ते आमच्यासोबत आहेत, असे शशी थरुर यांनी नमूद केले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
ही एकजूट भाजपविरोधात आतापर्यंतची सर्वांत मोठी शक्ती म्हणून समोर आली
शशी थरूर पुढे म्हणाले की, विरोधकांची ही एकजूट भाजपविरोधात आतापर्यंतची सर्वांत मोठी शक्ती म्हणून समोर आली आहे. हा भाजपच्या कृतीचा निषेध आहे. तिरुअनंतपुरमच्या खासदाराने राहुल गांधींवरील आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. कारण ललित मोदी किंवा नीरव मोदी दोघेही पळून गेले आहेत. परदेशात ते चैनीचे जीवन जगत आहेत. तो मागासवर्गीय आहेत आणि हा ओबीसी समाजावर हल्ला आहे, असे म्हणणे हास्यास्पद आहे, असे शशी थरुर यांनी सांगितले.
दरम्यान, राहुल गांधींवरील खटला कमकुवत आहे. आमच्याकडे चांगले वकील आहेत. चौथे मोदी म्हणजेच पूर्णेश मोदी हे सिद्ध करू शकत नाहीत की, त्यांना कोणत्याही प्रकारे लक्ष्य करण्यात आले. राहुल गांधी यांच्या वकिलाने न्यायालयीन कामकाजात सुरुवातीपासूनच त्रुटी असल्याचा युक्तिवाद केला आहे. राहुल गांधींनी आपल्या भाषणात त्यांच्यावर टीका केलेली नाही. आमदार पूर्णेश मोदी यांच्याऐवजी या प्रकरणात पंतप्रधान मोदींनीच तक्रारदार असायला हवे होते, असा टोला शशी थरुर यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"