नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरीआंदोलनाची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग, पॉर्नस्टार मिया खलिफानेही शेतकरीआंदोलनाला पाठिंबा देताना भारत सरकारवर टीका केली. आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना हिने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यापासून संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. क्रिकेटपटू, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि राजकारणी यांच्यात आता ट्विटर वॉर सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शेतकरी आंदोलनासंदर्भात भारतरत्न सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहलीपासून ते शिखर धवन, सायना नेहवाल, अक्षय कुमार, तापसी पन्नूपर्यंत अनेकांनी ट्विट करून केंद्र सरकारला पाठिंबा दिला आहे. मात्र, खेळाडू आणि कलाकारांनी ट्विट करून सरकारला केलेल समर्थन काँग्रेस नेते शशी थरूर यांना रुचलेले दिसत नाही. कारण या सर्वांना शशी थरूर यांनी प्रत्युत्तर देत यामुळे भारताची प्रतिमा सुधारणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
नेमके काय म्हणाले शशी थरूर?
शशी थरूर यांनी एक ट्विट केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींच्या विधानांवर भारतीयांनी प्रतिक्रिया देणे लाजिरवाणे आहे. भारताच्या वैश्विक प्रतिमेचे सरकारच्या हट्टीपणामुळे आणि लोकशाहीविरोधी व्यवहारामुळे झालेले नुकसान क्रिकेटपटूंनी केलेल्या ट्विट्समुळे भरून निघणारे नाही, अशी टीका शशी थरूर यांनी केली आहे. केंद्र सरकारने कायदे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांच्या समस्यांचे चर्चेतून निराकरण करावे आणि मगच तुम्हाला एकत्रित, एकसंध भारत पाहायला मिळेल, असा टोलाही शशी थरूर यांनी लगावला आहे.
भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अमान्य: सचिन तेंडुलकर
सरकारच्या भूमिकेचे स्वागत
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही सरकारच्या भूमिकेचे स्वागत करताना म्हटले आहे की, भारत एक गौरवशाली राष्ट्र आहे. एक भारतीय म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की, एक राष्ट्र म्हणून आम्ही कोणत्याही समस्या किंवा अडचण जनहिताच्या भावनेने सोडविण्यास पूर्णपणे सक्षम आहोत. जय हिंद असे नारा देत लता मंगेशकर यांनी #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropagenda या दोन हॅशटॅगचा वापर केला आहे.
सचिन तेंडुलकरचे रिहानाला उत्तर
भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात. हस्तक्षेप मात्र करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. देश म्हणून आपण सर्व जण एकत्र राहू, असे ट्विट सचिन तेंडुलकर यांनी केले आहे.
आपण सर्वजण एकत्र राहूया
मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकत्र राहू या. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व बाजूंनी एक समाधानकारक तोडगा काढला जाईल जेणेकरून शांतता टिकेल आणि आम्ही सर्वजण पुढे जाऊ, असे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे.