नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरूर यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष निवडीसाठी होत असलेल्या दिरंगाईवर आक्षेप घेत संदीप दीक्षित यांना समर्थन दिले आहे. थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यामुळे पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल, असंही त्यांचे म्हणणे आहे.
थरूर यांनी संदीप दीक्षित यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, संदीप दीक्षित यांनी तेच म्हटलं आहे, जे देशभरातील अनेक नेते एकट्यात म्हणतात. यापैकी अनेक नेते पक्षात मोठ्या पदावर आहेत. त्यामुळे काँग्रेस वर्कींग कमिटीला मी विनंती करतो की, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आणि मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी काँग्रेस नेतृत्वासाठीची निवडणूक घ्यावी.
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस पक्षाला नेतृत्वाची गरज असल्याचे म्हटले होते. सध्या काँग्रेस पक्षासमोर सर्वात मोठे आव्हान नेतृत्व निवडण्याचे आहे. अनेक दिवसांपासून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. किंबहुना शोधण्यात यश आले नाही. मांजरीच्या गळ्यात घंटा बांधावी कोणी याच गर्तेत सर्व नेते असल्याचे दीक्षित यांनी म्हटले होते. त्यांना आता थरूर यांचे समर्थन मिळाले आहे.
सध्याच्या घडीला काँग्रेस पक्षात सहा ते आठ लोक आहेत, जे पक्षाचं नेतृत्व करू शकतात. राज्यसभेत असलेले आणि माजी मुख्यमंत्री असणाऱ्या नेत्यांनी जबाबदारी स्वीकारायला हवी. सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री हे पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. आता या नेत्यांनी समोर येऊन पक्षाला उभारी देण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे दीक्षित यांनी सांगितले होते.