नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन केलं. गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिराचा विषय भाजपाच्या अजेंड्यावर होता. अखेर आज राम मंदिराचा शिलान्यास सोहळा संपन्न झाला. त्या सोहळ्याला मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील संत उपस्थित होते. त्यामुळे अयोध्येत अतिशय मंगलमय वातावरण होतं. मात्र राम मंदिर भूमिपूजनासंदर्भात भाजपाच्या नेत्या शोभा करंदलाजे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे चांगलाच वाद झाला. भाजपा नेत्या शोभा करंदलाजे यांनी राम मंदिर भूमिपूजनासंदर्भात एक ट्विट केलं. त्यात पंतप्रधान मोदी आणि प्रभूरामचंद्राचं चित्र आहे. यामध्ये मोदी प्रभूरामांचं बोट धरून त्यांना मंदिराकडे नेताना दिसत आहे. या चित्रात मोदी मोठे आणि प्रभू राम यांना लहान दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेकांनी चित्रावर आक्षेप घेतला. मोदी प्रभू रामापेक्षा मोठे आहेत का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी एक ट्विट करत एक प्रश्न विचारला आहे. 'ना प्रेम सीखा है, ना त्याग सीखा है, ना करुणा सीखी है, ना अनुराग सीखा है, खुद को राम से बड़ा दिखाकर, खुश होने वालों तुमने, श्री रामचरितमानस का कौन सा भाग सीखा है?', असा प्रश्न थरूर यांनी उपस्थित केला आहे. थरूर यांच्याप्रमाणेच इतरांनीही शोभा यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.पंतप्रधान मोदींनी अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन केल्यानंतर अनेक नेत्यांनी ट्विट करून त्यांच्या भावना व्यक्त केल्या. कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गृहमंत्री अमित शहांनी आजचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक आणि गौरवपूर्ण असल्याचं म्हटलं. 'पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन आणि शिलान्यास संपन्न झाला. हा भारताच्या महान संस्कृतीमधील एक सुवर्णाध्याय आहे. ही एका नव्या युगाची सुरुवात आहे,' अशा भावना शहांनी व्यक्त केल्या.
रामचरितमानसचा कोणता भाग शिकलात?; मोदी अन् प्रभू रामांचा 'तो' फोटो पाहून थरूर यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 5:58 PM