नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांचे इंग्रजीचे ज्ञान सर्वश्रुत आहे. त्यांनी इंग्रजीचा एखादा अवघड शब्द वापरला की, त्याची हेडलाइन व्हायला वेळ लागत नाही. पुन्हा एकदा त्यांनी अशाच प्रकारचा अवघड शब्द वापरला आहे. रविवारी भाजपवर टीका करताना थरूर यांनी ''अॅलोडोक्साफोबिया'' हा शब्द वापरला होता. यानंतर सोशल मीडियावर या शब्दाचीच चर्चा सुरू झाली.
शशी थरुर यांनी ट्विट करुन ''अॅलोडोक्साफोबिया'' या शब्दाचा अर्थ आणि हा शब्द कुठे वापरायचा, हे समजावून सांगितले. उदाहरण देताना त्यांनी लिहिले की, 'आजचा शब्द, खरं तर गेल्या 7 वर्षांपासून- allodoxaphobia. याचा अर्थ विचारांची अनावश्यक भीती. उदाहरण- उत्तर प्रदेशातील भाजप सरकार लोकांवर देशद्रोह आणि UAPA अंतर्गत खटले नोंदवत आहे, कारण त्यांचे नेतृत्व ''अलोडॉक्साफोबियाने'' ग्रस्त आहे.'
या शब्दाचे स्पष्टीकरण देताना त्यांनी लिहिले की, 'ग्रीकमध्ये Allo म्हणजे वेगळे, doxo म्हणजे विचार आणि phobos म्हणजे भीती आहे.' शशी थरुर यांनी पूर्वीही अशप्रकारचे कठीण इंग्रजी शब्द वापरले आहेत. या ट्विटवर एका नेटकऱ्याने कमेंट केली क, इंग्रजी आणि शशी थरुर कधीकधी गोंधळ निर्माण करतात. दुसऱ्याने लिहिले की, शशी थरूर यांनी सर्वात कठीण इंग्रजी शब्द शिकवण्याची आणि ते व्हायरल करण्याची पद्धत अद्वितीय आहे. यावर अनेक राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत.