Shashi Tharoor on Mohan Bhagwat Shivling Statement: सध्या देशात ज्ञानवापीच्या मुद्द्यावरून भरपूर चर्चा सुरू आहेत. हा मुद्द्या चर्चिला जात असतानाच अशाच प्रकारचे अनेक दावे हिंदू संघटना आणि मुस्लीम संघटनांकडून केली जात आहेत. या घटनांमुळे देशाचे ऐक्य धोक्यात येऊ नये ही सर्वसामान्य जनतेची इच्छा असल्याचे सांगितले जाते. या मुद्द्यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, संघाच्या विचारसरणीवर सदैव टीका करणाऱ्या काँग्रेसच्या नेतेमंडळींनी मोहन भागवत यांच्या विधानाचे स्वागत केल्याचे दिसून आले आहे. नुकतेच काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मोहन भागवत यांच्या विधानावर ट्वीट करून आपले मत व्यक्त केले.
सरसंघचालक काय म्हणाले?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाचा गुरुवारी समारोप झाला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, "देशावर आक्रमण केल्यानंतर इस्लामी राज्यकर्त्यांनी अनेक मंदिरे तोडली. मुळात हिंदू समाजाच्या मनोबलाचे खच्चीकरण करण्याचा तो प्रयत्न होता. हिंदूंना वाटते की, आता अशा स्थानांचा पुनरुद्धार व्हायला हवा; परंतु आताचे मुस्लीम हे आपल्याच पूर्वजांचे वंशज आहेत. या घटना इतिहासात घडल्या होत्या. आता मुस्लिमांनी न्यायव्यवस्थेचा आदर केला पाहिजे, आणि हिंदूंनी दररोज नवी प्रकरणे काढणे टाळले पाहिजे. प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध का घेता?", असे मार्गदर्शनपर विधान त्यांनी केला.
शशी थरूर यांनी केलं विधानाचं स्वागत
संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले विधान हे अतिशय समर्पक आणि योग्य आहे. मोहन भागवत यांच्या या अत्यंत रचनात्मक विधानाचे मी स्वागत करतो. आपण इतिहासाचे वाद बाजूला ठेवायला शिकले पाहिजे. तसेच, इतिहासाचा वापर एकमेकांच्या विरोधात अस्त्र म्हणून करणंही थांबवलं पाहिजे, असे ट्वीट करत त्यांनी मोहन भागवत यांच्या विधानाला पाठिंबा दर्शवला.
राज्यातील काँग्रेस नेत्यानेही दर्शवला पाठिंबा
सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलेली भूमिका सर्व धर्म, पंथ आणि लोकांना जोडणारी आहे. ही भूमिका त्यांनी कायम ठेवली पाहिजे, काँग्रेसची भूमिका सर्वधर्म समभावाची राहिली आहे. त्यानुसार आम्ही धर्माचे पालन करतो आणि संविधानानुसार राज्य कारभार पाहतो. मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.