ठळक मुद्देकाँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे एका व्हिडीओमुळे अडचणीत येण्याची शक्यता एका कार्यक्रमामध्ये तक्रारी ऐकत असताना संतापलेल्या सिद्धारामय्या यांनी तक्रार करत असलेल्या महिलेवर खेकसून तिची ओढणी ओढण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल हा प्रकार म्हैसूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडला
बंगळुरू - काँग्रेस नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या हे एका व्हिडीओमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमामध्ये तक्रारी ऐकत असताना संतापलेल्या सिद्धारामय्या यांनी तक्रार करत असलेल्या महिलेवर खेकसून तिची ओढणी ओढण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान, या प्रकारावरून भाजपाने काँग्रेसवर टीका केली आहे. हा प्रकार म्हैसूरमधील एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडला असून, तिथे उपस्थित असलेल्या सिद्घारामय्यांकडे एक महिला तक्रार मांडत होती. मात्र सिद्धारामय्या यांनी दिलेल्या उत्तरावर त्या महिलेचे समाधान होत नव्हते. त्यामुळे तिने सिद्धारामय्यांसोबत वाद घातला. या प्रकारामुळे संतापलेले सिद्धारामय्या त्या महिलेला वारंवार शांत राहण्यास सुनावले. मात्र सदर महिला ऐकून घेण्यास तयार नव्हती. त्यावेळी त्या महिलेला शांत करण्याच्या नादात सिद्धारामय्या यांच्याकडून तिची ओढणी खेचली गेली.
दरम्यान, या प्रकारावर स्पष्टीकरण देताना काँग्रेस नेते दिनेश गुंडू राव म्हणाले की, कधीकधी लोक टोकाचे प्रश्न विचारतात. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरही ते शांत राहत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांच्या हातातील माईक खेचण्याचा प्रयत्न करता. माईक खेचतानाच सदर महिलेची ओढणी खेचली गेली. त्या महिलेशी गैरवर्तन करण्याचा सिद्धारामय्या यांचा हेतू नव्हता.
दरम्यान, या प्रकारावरून भाजपाने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. सिद्धारामय्या यांनी ज्या प्रकारे संबंधित महिलेशी गैरवर्तन केले. त्यावरून त्यांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन दिसून आला. हा गुन्हा आहे. आता सिद्धारामय्या यांच्यावर काय कारवाई करणार याचे उत्तर रहुल गांधी यांनी द्यावे, असे भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संबंधित महिलेने प्रसारमाध्यमांसमोर येत झाल्या प्रकाराबाबत आपली कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच सिद्धारामय्या हे राज्याचे चांगले मुख्यमंत्री होते, असेही या महिलेने सांगितले.
तसेच सिद्धारामय्या यांनीही त्या महिलेशी गैरवर्तन करण्याचा आपला हेतू नव्हता. त्या महिलेला बोलण्यापासून रोखत असताना अनावधानाने तो प्रसंग घडला. सदर महिलेला मी 15 वर्षांपासून ओळखतो. तसेच ती माझ्यासाठी बहिणीसारखी आहे, असे सिद्धारामय्या यांनी सांगितले.