कर्नाटकात दणदणीत विजय आणि स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काँग्रेस आता लवकरच मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करू शकते. रविवारी बंगळुरू येथील एका हॉटेलमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. यामध्ये काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित १३५ आमदार सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यासाठी यावेळी आमदारांनी मतदान केलं. आमदारांमध्ये कुणी डीके शिवकुमार, कुणी सिद्धरामय्या, कुणी डॉ.परमेश्वर, कुणी खर्गे तर कुणी लिंगायत नेते एम.बी.पाटील यांचं नाव सुचवल्याची माहिती समोर आली आहे. काही आमदारांनी हा निर्णय पक्षाच्या हायकमांडवर सोडलाय.
खर्गेंसमोर होणार मतमोजणी
दरम्यान, बॅलेट बॉक्स हायकमांडकडे नेण्यात येणार असून खर्गेंसमोर मतमोजणी केली जाणार आहे. सर्वाधिक मतं मिळणाऱ्या नेत्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल. याचं कारण हे मतदान केवळ मतं जाणून घेण्यासाठी करण्यात आलं होतं. सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्याशी चर्चेनंतर मंगळवार किंवा बुधवारपर्यंत निर्णय घेतला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि ३० कॅबिनेट सदस्यांचा शपथविधी होऊ शकतो.
सिद्धरामय्यांचा फॉर्म्युला
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धरामय्या यांनी पहिल्या दोन वर्षांसाठी आपल्याला मुख्यमंत्री बनवावं आणि नंतर तीन वर्षांसाठी डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपवावी असा सल्ला दिला आहे. परंतु सिद्धरामय्यांचा हा फॉर्म्युला छत्तीसगढ आणि राजस्थान यांचा हवाला देत फेटळाण्यात आला. दरम्यान, दोन्ही नेत्यांनी सर्व आमदारांकडे समर्थन मागितलंय. परंतु हायकमांडसमोर डीके शिवकुमार यांना नेत्याच्या रुपात निवडलं तर सिद्धरामय्या यांची समजूत कशी काढावी आणि त्यांना काय जबाबदारी द्यावी हा प्रश्न समोर आहे. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्याद्वारे करण्यात आलेल्या प्रयत्नांची पक्षाला उत्तम माहिती असल्यानं शिवकुमार यांचं पारडं जड असल्याचं म्हटलं जातंय.