लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेसच्या पराभवांचे वाभाडे काढले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर झालेल्या चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देत होते. तेव्हा त्यांनी काँग्रेसने कोरोना काळात हद्द पार केल्याचा आरोप केला. काँग्रेसनंच देशभरात कोरोना पसरविल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असं मोदी म्हणाले. यावरून आता कांग्रेसनं मोदींवर निशाणा साधला.
युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही श्रमिक ट्रेन चालवल्या आणि ६३ लाख श्रमिकांना घरी पोहोचवण्याचं काम केल्याचं मोदी सरकारमधील मंत्री बोलत असल्याचं दिसत आहे. हा दावा त्यांनी २ फेब्रुवारी रोजी संसदेत केल्याचंही श्रीनिवास बी. व्ही. यांनी म्हटलं आहे.
कोरोनामुळे परिस्थिती बिघडविण्याची योजना होती. नरेंद्र मोदी कसा सामोरा जाणार, अपयशी होणार असा त्यांचा प्लॅन होता. म्हणून मुंबईच्या स्टेशनवर श्रमिकांची गर्दी जमविण्यात आली. युपी, बिहारच्या लोकांना पाठविण्यात आले. सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यात आल्याचा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला.