नॅशनल हेराल्ड केस प्रकरणी दुसऱ्या फेरीच्या चौकशीसाठी काँग्रेसच्याच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी मंगळवारी पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत. यानंतर, ईडीच्या या कारवाईविरोधात काँग्रेसने गल्लीपासून ते संसदेपर्यंत जबरदस्त विरोध केला. या मुद्द्यावर एकीकडे, काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात सरकारला घेरले, तर दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी, रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि महिला विंगने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयावर केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. तसेच, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी संसदेपासून विजय चौकापर्यंत मार्च काढला. यानंतर, राहुल गांधींनी खासदारांसह विजय चौकात धरणे आंदोलन केले. यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि इतर काही खासदारांना ताब्यात घेतले आहे.
काय म्हणाले राहुल गांधी? -पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसचे सर्व खासदार येथे बेरोजगारी आणि महागाईसंदर्भात बोलण्यासाटी आले होते. मात्र, पोलीस येथे बसू देत नाहीत. संसदेत चर्चा होऊ दिली जात नाही. येथे आम्हाला अटक केली जात आहे.
तत्पूर्वी, दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला राजघाटावर निदर्शन करण्याची परवानगी देण्यास नकार दिला होता. येथे कलम 144 लागू करण्यात आले होते. एवढेच नाही, तर काँग्रेसच्या कार्यालयाबाहेरही मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले होते.