नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायदा (एनआरसी) या मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात करण्यात आलेले आंदोलन, विद्यापीठ परिसरात झालेल्या हिंसाचारानंतर उद्धभवलेली परिस्थिती तसेच विविध विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. केंद्र सरकार संविधानाला कमकुवत करत आहे. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशभरात खोटी माहिती देत लोकांमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे. केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग करण्यात येत असून या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. त्याचप्रमाणे सीएए आणि एनआरसी आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेश आणि दिल्ली पोलिसांची वागणूक पक्षापाती व क्रूर होती असाही आरोप सोनिया गांधींनी केला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या या बैठकीला 20 पक्षांचे नेते उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, ए. के. अँटनी, के. सी. वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद, रणदीप सुरजेवाला, सीताराम येचुरी, डी. राजा, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, राजदचे मनोज झा, अजित सिंह देखील उपस्थित होते.