Congress Sonia Gandhi ( Marathi News ) : अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सध्या देशभर चर्चा सुरू आहे. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं आहे. देशातील प्रमुख विरोधी राजकीय पक्षाच्या नेत्यांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाणार की नाही, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र आता अखेर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांना या सोहळ्यासाठी निमंत्रण प्राप्त झालं आहे. याबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी माध्यमांना माहिती दिली.
मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधी यांना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण प्राप्त झालं असून याबाबतचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे. जयराम रमेश यांनी सावध भूमिका मांडली असली तरी सोनिया गांधी या सोहळ्याला जाण्यासाठी सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे. याबाबत 'एनडीटीव्ही' या वाहिनीने वृत्त दिलं आहे.
'एनडीटीव्ही'च्या वृत्तानुसार, राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या मुद्द्यावर काँग्रेसने इंडियन युनियन मुस्लीम लीगसारख्या इंडिया आघाडीतील इतर मित्रपक्षांशी देखील चर्चा केली आहे. राम मंदिर सोहळ्याला उपस्थित न राहिल्यास भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीत या मुद्द्यावरून काँग्रेस आणि इंडिया आघाडीला घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो. त्यामुळे भाजपच्या हाती हे आयतं कोलीत मिळू नये, यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. त्यामुळेच सोनिया गांधी या स्वत: अयोध्येत उपस्थित राहू शकतात किंवा त्यांच्या वतीने एक शिष्टमंडळ या सोहळ्याला हजेरी लावेल.
दरम्यान, एकीकडे काँग्रेस या सोहळ्यात सहभागी होण्याबाबत सकारात्मक असलं तरी याचा इंडिया आघाडीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण इंडिया आघाडीत समाविष्ट असलेल्या सीपीआयच्या नेत्या वृंदा करात यांनी याआधीच आपला पक्ष अयोध्येतील सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. "कोणाच्याही धार्मिक भावनांना आमचा विरोध नाही. मात्र भाजपकडून या मुद्द्याचा राजकीय कारणासाठी शस्त्र म्हणून वापर केला जात आहे," असं करात यांनी म्हटलं आहे.