- शीलेश शर्मानवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाध्यक्षा साेनिया गांधी ॲक्शन माेडमध्ये आल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गाेवा आणि मणिपूर या निवडणूक झालेल्या पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यासंदर्भात माहिती दिली. साेनिया गांधींच्या आदेशानंतर गाेव्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चाेडणकर आणि उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष गणेश गाेदियाल यांनी तत्काळ राजीनामा दिला, तर पंजाबचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी निकालाच्या दिवशीच १० मार्चला राजीनामा देऊ केला हाेता. या राज्यांमध्ये नव्याने काँग्रेसची कार्यकारिणी स्थापन करण्यात येणार आहे. अजय कुमार लल्लू हे उत्तर प्रदेशचे तर एन. लाेकेन सिंह हे मणिपूरचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
काॅंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनीही सोमवारी एक बैठक बाेलाविली हाेती. त्यात उत्तर प्रदेशातील पराभवानंतर अजय कुमार लल्लू यांना पक्षातील नेत्यांनी लक्ष्य केले. त्यांना प्रदेशाध्यक्ष बनविण्याच्या निर्णयावर यापूर्वीही उत्तर प्रदेशातील नेत्यांनी विराेध केला हाेता. त्याच प्रकारे पंजाबमध्येही चरणजीतसिंह चन्नी आणि सिद्धू यांच्यावरही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
गाेव्यात पहिला राजीनामा
गोव्यात आता प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत कार्याध्यक्ष तथा नव निर्वाचित आमदार आलेक्स सिक्वेरा व मुरगावचे नवनिर्वाचित आमदार संकल्प आमोणकर यांची नावे चर्चेत आहेत.विधानसभा निवडणुकीत काँग्रेस २२पेक्षा अधिक जागांवर जिंकून राज्यात सरकार स्थापन करेल, असा दावा चोडणकर यांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात काँग्रेसला केवळ ११ जागांवर विजय मिळाला. त्यामुळे सलग तीनवेळा विरोधात बसण्याची नामुष्की काँग्रेसवर आली आहे.