नवी दिल्ली: १३ डिसेंबर २०२३ रोजी लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी चक्क खासदारांच्या बाकांवर उड्या घेतल्या आणि घोषणाबाजी केली. यानंतर स्मोक क्रॅकर फोडून धूर केला. या घटनेत देशाची सर्वोच्च इमारत असलेल्या संसदेची सुरक्षा भेदली गेली आणि संपूर्ण देश हादरला. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या चार जणांना पकडले गेले असून या घटनेची आता चौकशी केली जात आहे.
काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी लोकसभेत घडलेल्या या घटनेदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये राहुल गांधी उभे असल्याचे दिसत आहे, तर दोन जण प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारत आहेत आणि संसदेत गोंधळाचे वातावरण आहे. ट्विटरवर फोटो शेअर करताना श्रीनेत यांनी लिहिले की, घाबरू नका, हे नुसते सांगत नाहीत, करून दाखवतात. राहुल गांधींच्या सुप्रिया श्रीनेत यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये, "जेव्हा संसदेत गोंधळ सुरू होता, तेव्हा जननेता छाती पुढे करून उभे होते," असे कॅप्शनही लिहिले आहे.
दरम्यान, संसदेच्या कामकाजादरम्यान घुसलेल्या दोघांचे नाव सागर शर्मा आणि मनोरंजन डी असे आहे. तसेच, त्यांच्या दोन साथीदारांना संसदेबाहेर पकडण्यात आले. नीलम आणि अनमोल शिंदे अशी त्यांची नावे आहेत. एकूण चार जण होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संसद भवनाबाहेर धुराचे सोडल्यानंतर त्या दोघांनीही 'हुकूमशाही चालणार नाही', 'भारत माता की जय' आणि 'जय भीम, जय भारत' अशा घोषणा दिल्या.
तरुणांकडे कोणाचा पास?
सागर शर्मा, मनोरंजन डी, अमोल शिंदे आणि नीलम या चौघांचे पास म्हैसूरचे भाजप खा. प्रताप सिम्हा यांच्या नावावरून काढण्यात आले होते. संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांना भेटून स्पष्टीकरण देत ते म्हणाले, मतदारसंघातील लोकांच्या सांगण्यावरून पास तयार केले होते. त्यांना मी ओळखत नाही.
खासदारांच्या पीएचे पास रद्द
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेबाबत अनेक बैठका घेतल्या व संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यांनी प्रेक्षक गॅलरीचे सर्व पास रद्द केले. सर्व विद्यमान व माजी खासदारांच्या पीएचे पासही रद्द केले.