"अण्णा आंदोलनातून एकजण मुख्यमंत्री झाला तर दुसरा मोठा व्यापारी...तुम्हाला काय मिळालं?"
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 11:58 AM2021-12-13T11:58:21+5:302021-12-13T11:58:35+5:30
Baba Ramdev, Arvind Kejriwal And Congress : काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी केजरीवाल आणि रामदेव बाबा यांच्या फोटोवरून अण्णा आंदोलनावर जोरदार टीका केली आहे.
नवी दिल्ली - युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास (Congress) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या गळाभेटीचा एक फोटो शेअर करून निशाणा साधला आहे. "अण्णा आंदोलनातून एकजण मुख्यमंत्री झाला, तर दुसरा मोठा व्यापारी झाला. अण्णा आंदोलनातून तुम्हाला काय मिळालं?" असा प्रश्न श्रीनिवास यांनी विचारला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
2011 मध्ये भ्रष्टाचाराविरोधात आणि लोकपालच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनावरून केजरीवाल आणि रामदेव बाबांवर टीकास्त्र सोडलं आहे. 2011 च्या आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण केलं होतं. जनलोकपाल विधेयक संसदेत पारीत झालं नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा उपोषण करावं लागलं. त्यामुळे नंतर सरकारने लोकसभेत हे विधेयक संमत केलं आणि अण्णांनी आंदोलन मागे घेतलं.
एक मुख्यमंत्री बन गया,
— Srinivas BV (@srinivasiyc) December 11, 2021
एक सबसे बड़ा व्यापारी
अन्ना आंदोलन से आपको क्या मिला? pic.twitter.com/G8siqVkT40
या आंदोलनात अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव, कुमार विश्वास, संजय सिंह अशा अनेकांनी सहभाग घेतला होता. रामदेव बाबांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. नंतरच्या काळात यापैकी काही नेत्यांनी आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि सत्तेतही आले. अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले आहेत. यावरूनच काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी केजरीवाल आणि रामदेव बाबा यांच्या फोटोवरून अण्णा आंदोलनावर जोरदार टीका केली आहे.
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हे काही काळासाठी हॅक झालं होतं. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. याच दरम्यान बिटकॉईन संदर्भात ट्विट करण्यात आलं होतं. यावरून देखील काँग्रेस नेते श्रीनिवास यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, "हा योगायोग होता की प्रयोग होता, हॅकर्सला देखील भारतात बिटकॉईन विकण्यासाठी सर्वात मोठा सेल्समन कोण आहे हे माहिती होतं. हॅकर्स मोदीजींच्या अकाऊंटवरून बिटकॉईन विकत होते तेव्हा चौकीदार कोठे होते?" असा प्रश्न श्रीनिवास यांनी आपल्या ट्वीटमध्ये विचारला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचं वृत्त दिलं आहे.