नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे काँग्रेस पक्षाला जबरदस्त धक्का बसला आहे. लोकसभेचे निकाल लागून महिना उलटत आला तरी या धक्क्यातून पक्षनेतृत्व आणि कार्यकर्ते सावरलेले नाहीत. दरम्यान, पक्ष संघटनेबाबत काँग्रेसमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, देशातील जनमताबाबत चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याने पक्षाने डेटा विश्लेषण विभागाचे प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांची हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र प्रवीण चक्रवर्ती यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. तसेच प्रसारमाध्यमांमधून काल्पनिक माहिती प्रसारित झाल्याचा आरोपही त्यांनी केला. माझ्यासंदर्भात एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तामधील प्रत्येक ओळ असत्यावर आधारीत आहे. ही भारतीय पत्रकारितेच्या पतनाची अंतिम सीमा आहे, असा आरोप काँग्रेसचे डेटा चिफ असलेल्या चक्रवर्ती यांनी एक वक्तव्य प्रासारित करून केला होता. मात्र चक्रवर्ती यांच्या या वक्तव्यानंतरही डेटा विभागाने दिलेल्या फीडबॅकबाबत काँग्रेसचे पक्षनेतृत्व खूप नाराज आहे. डेटा विभागाने नियमितपणे गोपनीय पद्धतीने दिल्या जाणाऱ्या पोलवर आधारित पूर्णपणे चुकीची माहिती पुरवली. पक्षाचा डेटा विभाग जनमानसाचा कौल जाणून घेण्यात अपयशी ठरला, असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, पुलवामा हल्ल्यानंतर निवडणूक खूप कठीण झाली होती. सरकारने बालाकोटवर एअर स्ट्राइक केली. त्यामुळे भाजपाला राष्ट्रवादाच्या नावावर जनतेला प्रभावित करण्याची संधी मिळाली. या घटनेनंतर नरेंद्र मोदींबाबत जनतेच्या मनात असलेला संभ्रम दूर झाला. तसेच आमच्या मुद्द्यांबाबत अधिकाधिक प्रश्न विचारले जाऊ लागले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका ज्येष्ठ नेत्याने चक्रवर्ती यांनी घेतलेले पोल आणि निकालांवर थेट नाराजी व्यक्त केली होती, तसेच ही माहिती विश्वासार्ह नाही, असे सांगितले होते. तसेच बुथस्तरावर सदस्य जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेले शक्ती अॅपही पूर्णपणे अपयशी ठरले. तसेच काँग्रेस अध्यक्षांसोबत जवळीक करण्यासाठी चक्रवर्ती यांनी अनेक विश्वासू नेत्यांना दूर करण्याचे काम केले, असा आरोपही काँग्रेसमधील काही नेत्यांनी केला.
यांच्यावर फुटणार काँग्रेसच्या पराभवाचे खापर? चुकीची माहिती दिल्याने पक्षनेतृत्व नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 5:46 PM