राजस्थानकाँग्रेसचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले काँग्रेसचे नेते आपापसातच भिडल्याच पाहायला मिळत आहे. इतर नेते व कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनंतर हे प्रकरण मिटले आणि सर्वजण शांत झाले. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे देखील या कार्यक्रमात सहभागी होणार होते. त्याचवेळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
जयपूरमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सदस्यांची महत्त्वाची बैठक होणार होती. या बैठकीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा, अजय माकन यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच काँग्रेस सेवादलाचे नेते अंतर्गत वादातून एकमेकांना भिडले. वादाचे रुपांतर पुढे धक्काबुकीत झाल्याचेही दिसून झाले. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मीडिया कर्मचार्यांनी याचा व्हिडिओ काढला असून सध्या तो तुफान व्हायरल होत आहे.
"राजस्थानमधून काँग्रेसची उलटी गिनती सुरू"
आम आदमी पार्टी, राजस्थानच्या वतीने हा व्हिडीओ शेअर करण्यात आहे. तसेच यावरून निशाणा देखील साधण्यात आला आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत काँग्रेस नेते आपापसात भांडत आहेत, आता राजस्थानमधून त्यांची उलटी गिनती सुरू झाल्याचं म्हटलं आहे. तर एका युजरने राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढत आहेत आणि येथे घरातलीच लोक जोडता येत नाही असं म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा
काँग्रेसमध्ये कार्यकर्ते आणि नेते एकमेकांना भेटू शकतात आणि सर्वकाही करू शकतात. इतर पक्षांप्रमाणे नाही की हायकमांडच्या भीतीने आवाजच काढायचा नाही असंही एकाने म्हटलं आहे. तसेच आधी काँग्रेस जोडा, देश पूर्वी एकसंध होता आणि राहील. इंग्रज सुद्धा प्रयत्न करून परत गेले, तेव्हा देखील ते देशाची एकता खंडीत करू शकले नाहीत. मग आता काय होणार? सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमुळे लोक राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर निशाणा साधताना दिसत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.