मंत्रिपदांची नावे निश्चित करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत; वडेट्टीवार, केदार, यशोमती ठाकूर यांचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2019 02:00 AM2019-12-04T02:00:25+5:302019-12-04T02:00:43+5:30
काँग्रेसमधून कोणत्या आमदारांना संधी द्यावयाची, यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत.
नवी दिल्ली : हिवाळी अधिवेशनापूर्वी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळावी, यासाठी काही काँग्रेस नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. मंत्रिपदासाठी काँग्रेस श्रेष्ठींची भेट घेणार असल्याचे समजते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसमधून बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांना संधी मिळाली आहे. काँग्रेसच्या कोट्यात आणखी ८ मंत्रिपदे आहेत. हा विस्तार येत्या काही दिवसात होणार असल्याचे समजते.
काँग्रेसमधून कोणत्या आमदारांना संधी द्यावयाची, यासाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात सोमवारी रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत.
तसेच मंत्री नितीन राऊतही दिल्लीत आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांचेही दिल्लीत आगमन झाले आहे. मंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये बरीच रस्सीखेच दिसत आहे.
मंत्रीपदासाठी विदर्भातील विजय वडेट्टीवार यांच्यासह सुनील केदार, यशोमती ठाकूर, रणजित कांबळे यांचीही नावे आघाडीवर आहेत.