राज्यातील राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची सोनिया गांधींसोबत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 09:20 PM2019-11-01T21:20:10+5:302019-11-01T21:20:55+5:30
मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळातील पदांच्या समसमान वाटणीवरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने राज्यात सरकार नवे स्थापन होऊ शकलेले नाही.
नवी दिल्ली - मुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळातील पदांच्या समसमान वाटणीवरून भाजपा आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाल्याने राज्यात सरकार नवे स्थापन होऊ शकलेले नाही. दरम्यान, महायुतीतील मतभेदांमुळे राज्यात निर्माण झालेल्या राजकीय पेचाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना राज्यातील सध्याची परिस्थिती तसेच विधानसभा निकालांसंदर्भात माहिती दिली.
सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या 10 जनपथ येथे झालेल्या बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की,''आज झालेल्या बैठकीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील निकाला संदर्भात माहिती सोनिया गांधी यांना दिली. निवडून आलेल्या जागा, मतविभाणी आणि गमावलेल्या जागांसंदर्भात चर्चा झाली. तसेच सध्या राज्यात निर्माण झालेली परिस्थितीची कल्पनाही सोनिया गांधी यांना दिली.'' मात्र या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली का याबाबत सांगणे मात्र थोरात यांनी टाळले.
महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर भजापा आणि शिवसेनेने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. त्यातच राज्यात भाजपाला रोखण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. तसेच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सोनिया गांधीसुद्धा फारशा अनुकूल नाहीत.