लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :केरळमधीलकाँग्रेसचे नेते भविष्यातील ध्येय-धोरणांबाबत एकत्र आहेत, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले. केरळमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी इंदिरा भवन येथे दक्षिणेकडील राज्यातील नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर गांधी बोलत होते.
बैठकीनंतर केरळ नेत्यांनी माध्यमांना दिलेला फोटो पोस्ट करताना गांधी यांनी फेसबुकवर लिहिले की, ‘ते एकत्र उभे आहेत, पुढील ध्येयांसाठी त्यांच्यात एकजूट आहेत.’ त्यांच्या पोस्टबरोबर ‘टीम केरळ’ हा हॅशटॅग होता. काँग्रेसचे मुख्यालय ‘इंदिरा भवन’ येथे झालेल्या बैठकीचे शिस्त, एकता आणि राज्य संघटनेचे बळकटीकरण हे मुख्य विषय होते.
पक्षाविरोधात बोलू नये
गांधी यांनी बैठकीत म्हटले की, नेत्यांनी राजकीय रणनीतीबाबत खूप काळजी घेतली पाहिजे. पक्षाच्या धोरणाशी न जुळणारे काहीही करू नये किंवा बोलू नये.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाच्या केरळ युनिटला बळकटी देण्यासाठी रिक्त पदे भरण्यावर भर दिला होता.बैठकीला पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, सरचिटणीस आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वढेरा, राज्य प्रभारी दीपा दासमुन्शी उपस्थित होते.