राज्यातील घडामोडींवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज सोनिया गांधींशी चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 02:46 AM2019-11-01T02:46:11+5:302019-11-01T06:34:22+5:30
शिवसेना आणि भाजप यांच्यात सरकार स्थापन करण्यावरून जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती समोर ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निर्णय घेतील.
शीलेश शर्मा
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेल्या वादावादीवर काँग्रेसची बारीक नजर असून उच्चपदस्थ सूत्रांनुसार महाराष्ट्रातील चार मोठे नेते पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना शुक्रवारी भेटण्यासाठी गुरुवारी रात्री दिल्लीला जात आहेत. त्यात प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण तसेच विजय वडेट्टीवार यांचा समावेश आहे.
या नेत्यांची महाराष्ट्राचे प्रभारी महासचिव मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत सोनिया गांधी यांच्याशी भेट होईल. तीत विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड व राज्यातील ताज्या राजकीय घडमोडींवर चर्चा होण्याचे संकेत आहेत. सूत्रांनी दावा केला की, नियोजित बैठकीत हे ठरण्याची शक्यता आहे की विधानसभेत पक्षाचा नेता कोण असेल. शिवसेना व भाजप यांच्यात सरकार स्थापण्यावरून सुरू असलेल्या वादावरही बैठकीत चर्चा होईल. परंतु, निर्णय सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतरच घेतला जाईल.
पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, शिवसेना आणि भाजप यांच्यात सरकार स्थापन करण्यावरून जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती समोर ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन निर्णय घेतील. शरद पवार यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले जाऊ शकतात व काँग्रेस त्यानुसार चालेल, असे हा नेता म्हणाला. कारण काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या इच्छेविरुद्ध या गुंतागुंतीच्या मुद्यावर कोणताही निर्णय घेऊ इच्छित नाही.