नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतकाँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या दोन नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. माजी आमदार नीरज बसोया आणि नसीब सिंह यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामे पाठवले आहेत. आम आदमी पार्टी (आप) सोबतच्या युतीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आपल्या राजीनामा पत्रात नसीब सिंह यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितले की, "तुम्ही देविंदर यादव यांची डीपीसीसी प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. काँग्रेसचे पंजाब प्रभारी अरविंद केजरीवाल या नात्याने त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या खोट्या अजेंड्यावर हल्लाबोल केला होता आणि प्रचार केला होता. आज दिल्लीत ते आप आणि केजरीवाल यांचे कौतुक आणि समर्थन करतील. पक्षातील ताज्या घडामोडींमुळे अत्यंत दु:खी आणि अपमानित होऊन मी पक्षाचा राजीनामा देत आहे."
नीरज बसोया यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की, "आपसोबतची आमची युती अत्यंत अपमानास्पद आहे. कारण गेल्या सात वर्षांत आप अनेक घोटाळ्यांशी संबंधित आहे. आपचे तीन प्रमुख नेते अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया आधीच तुरुंगात आहेत. आपवर दिल्ली मद्य घोटाळा, दिल्ली जल बोर्ड घोटाळा यांसारख्या गंभीर आरोप आहे. आपसोबत युती करून काँग्रेसने केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला क्लीन चिट दिली आहे, असे समजते."
दरम्यान, याआधी दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा होती. यावर आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करत नाहीत, असे अरविंदर सिंग लवली यांनी स्पष्टीकरण दिले. तसेच, अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत राजकारण तापले होते. अरविंदर सिंग लवली यांनी अनेक मुद्द्यांवर नाराजी व्यक्त करत काँग्रेस पक्षावर अनेक गंभीर आरोप केले होते. अरविंदर सिंग लवली यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र यादव यांना दिल्ली काँग्रेसचे अंतरिम प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले आहे.