रांची : झारखंडमध्ये निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे. मात्र, काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये मरगळ आलेली आहे. लोकसभेला दारूण पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा घेतलेले राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आतापर्यंत राहुल गांधी फारसे सक्रीय दिसले नाहीत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच सभा घेतल्या होत्या. आता झारखंडमध्येही तोच कित्ता गिरविला जात आहे. यामुळे स्थानिक नेते दुबळे ठरणार आहेत.
झारखंडमध्ये 30 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणुकीला प्रचारासाठी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या येण्याबाबत काही निश्चिती नाही. तर पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांना प्रचारासाठी बोलवणे नाही. स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये राहुल गांधी यांचे नाव आहे. तसेच त्यांना राज्यातील प्रमुख मुद्द्यांची यादी दिली आहे. मात्र पहिला टप्पा उलटायला 9 दिवस बाकी असताना राहुल यांच्या सहभागाबाबत संदिग्धता आहे.
सध्याच्या घडीला मध्य प्रदेशचे नेते ज्योतिरादित्य सिंधिया काही भागात प्रचार करणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात राजकीय सत्तासमीकरणे बदलल्याने कार्यरत झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी झारखंडकडेही पाठ फिरवल्याचे चित्र आहे. झारखंडचे प्रदेश अध्यक्षच निवडणुकीच्या रिंगणात असल्याने त्यांना त्यांच्या मतदारसंघात लक्ष द्यावे लागत आहे. यामुळे त्यांना राज्यात फिरता येत नाही.
29 नोव्हेंबरला राष्ट्रीय स्तरावरील काँग्रेसचे नेते आणण्याचा प्रयत्न असल्याचे राज्यातील नेत्यांनी सांगितले. यामध्ये मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री येण्याची शक्यता आहे.