नवी दिल्ली : काँग्रेस पक्षातील नेत्यांनी आपापसात भांडत बसण्यापेक्षा, लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी काँग्रेसने लढावे, असे जनतेला वाटते असे उद्गार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शनिवारी काढले. त्या पक्षातील नाराज २३ नेत्यांचे नाव न घेता राहुल गांधी यांनी त्यांना हा टोला लगावला.काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ते म्हणाले की, कोणती व्यक्ती कोणत्या पदावर आहे याला जनतेच्या लेखी फारसे महत्व नाही. त्यापेक्षा लोकशाहीला, राज्यघटनेला वाचविण्यासाठी तसेच लोकांच्या हक्कांच्या रक्षणासाठी काँग्रेसने एकजुटीने लढा उभारला आहे हे चित्र पाहाण्यात जनतेला अधिक रस आहे. अमरिंदरसिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागी चरणजितसिंग चन्नी यांची निवड करण्यात आली. हा निर्णय सोनिया गांधी यांनी दूरध्वनीवरून कळविताच चन्नी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, अशी आठवणही राहुल गांधी यांनी सांगितली.राहुल गांधी म्हणाले की, एखाद्याचे मत न ऐकणे ही देखील अस्पृश्यताच आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आदी लोकांचेही मत मोदी सरकार जाणून घेत नाही. भाजप व रा. स्व. संघाला समाजात दुही निर्माण करायची आहे.डोळ्यांत अश्रू तरळले : चरणजितसिंग चन्नीचरणजितसिंग चन्नी म्हणाले की, दलित समाजातील असलेल्या व अतिशय सामान्य परिस्थितीतून वर आलेल्या माझ्यासारख्या माणसाने मुख्यमंत्री होण्याची कधी स्वप्ने बघणे शक्यच नव्हते. पण राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्यामुळेच मी पंजाबचा मुख्यमंत्री होऊ शकलो. मला मुख्यमंत्री करण्यात येणार असल्याचा निर्णय सोनिया गांधी यांनी कळविताच माझ्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.
काँग्रेस नेत्यांनी जनतेच्या हक्कांसाठी लढावे; राहुल गांधी यांचा नाराज नेत्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 5:20 AM