शहांच्या टेबलवर पोहोचली फाईल, राहुल-सोनियांचं नागरिकत्व जाईल; स्वामींनी सांगितली आतली बातमी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 01:58 PM2020-02-20T13:58:07+5:302020-02-20T13:59:38+5:30
सुधारित नागरिकत्व कायद्यावर बोलताना स्वामींचं मोठं विधान
हैदराबाद: सध्या देशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशभरात आंदोलनं सुरू आहेत. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे (सीएए) कोणाचंही नागरिकत्व जाणार नाही. उलट यामुळे नागरिकत्व दिलं जाईल, असा मोदी सरकारचा दावा आहे. तर सीएए घटनाविरोधी असल्याचा प्रतिदावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे राज्यसभेतले खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी मोठं विधान केलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं नागरिकत्व लवकरच जाणार असल्याचा दावा त्यांनी केला.
हैदराबाद विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुब्रमण्यम स्वामी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्यावर भाष्य करताना सोनिया आणि राहुल गांधींचं नागरिकत्व लवकरच रद्द होणार असल्याचं सांगितलं. अमित शहांच्या टेबलवर एक फाईल आहे. त्यामुळे लवकरच त्या दोघांचंही नागरिकत्व जाईल, असं स्वामी म्हणाले.
'एखाद्या भारतीय व्यक्तीनं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारल्यास त्याचं भारतीय नागरिकत्व रद्द होतं. संविधानात तसं नमूद करण्यात आलेलं आहे,' असं स्वामी यांनी सांगितलं. राहुल गांधींना इंग्लंडमध्ये व्यवसाय सुरू करायचा असल्यानं ते लवकरच इंग्लंडचं नागरिकत्व स्वीकारणार असल्याचा दावा स्वामींनी केला. राहुल यांचे वडील (राजीव गांधी) भारतीय होते. त्यामुळे ते भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात. मात्र सोनिया गांधी तसं करू शकत नाहीत, असं ते पुढे म्हणाले.
सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी तो कायदा नीट समजूनच घेतलेला नाही. त्यांनी तो कायदा वाचलेलाच नाही, अशा शब्दांत स्वामींनी आंदोलकांलर टीका केली. सीएएविरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीतल्या शाहीन बागेत मुस्लिम महिला आंदोलन करत आहेत. त्यावर भाष्य करताना सीएएचा भारतीय मुस्लिमांवर कोणताही परिणाम होणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.