नवी दिल्ली : संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर दोन्ही सदनांमध्ये आभार प्रस्ताववर चर्चा सुरू आहे. यावेळी लोकसभेमध्ये काही महत्वाची विधेयके सादर करण्यात आली. याचबरोबर काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकाही केली. अधीर रंजन चौधरी यांनी तर मोदींची तुलना गंदी नाली अशी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
अधीर रंजन यांनी संसदेत बोलताना मोदी यांची स्तुती केली. पंतप्रधान मोदी हे मोठे व्यापारी आहेत. यामुळेच भाजपा पुन्हा सरकार बनविण्यास यशस्वी झाली. आम्ही (काँग्रेस) आमची उत्पादने विकण्यात अपयशी झालो, असे म्हणत असतानाच त्यांनी मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टीकाही केली. या चर्चेची सुरूवात सारंगी यांनी केली होती. यामुळे अधिर रंजन यांनी पंतप्रधान मोदींची तुलना स्वामी विवेकानंदांशी केल्यावरून सारंगी यांच्यावर टीका केली.
यावरून भाजपाने इंदिरा यांची भारताशी तुलना केल्याचा आरोप केला. काँग्रेसने एकेकाळी 'इंदिरा इज इंडिया' असेच वातावरण बनविले होते. याला प्रत्युत्तर देताना अधिर रंजन यांची जीभ घसरली. त्यांनी इंदिरा गांधी या गंगे सारख्या आणि मोदी गंदी नाली की तरह अशी टीका केली. यासोबतच त्यांनी माझे तोंड उघडायला लावू नका, असा इशारच भाजपाला देऊन टाकला.