नवी दिल्ली - देशात एनआरसी आणि सीसीए यावरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी या कायद्यांचा विरोध करण्यासाठी हिंसक घटना घडल्या आहेत. तर या कायद्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मोर्चेही निघत आहेत. याच मुद्दावर काँग्रेसनेते अधीर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
चौधरी म्हणाले की, मोदी अशा पद्धतीने बोलतात जस काय त्यांनी एनआरसीविषयी काहीही ऐकल नाही. तर गृहमंत्री अमित शाह स्वत: संसदेत सांगतात की एनआरसी संपूर्ण देशात लागू करण्यात येईल. हे रामू-श्यामू काय म्हणतात याकडे आम्हाला लक्ष द्यावे लागेल, अशा शब्दांत चौधरी यांनी मोदी-शाह यांच्यावर टीका केली. तसेच हे दोघे फसविण्यात मास्टर असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावरून केलेल्या भाषणानंतर चौधरी यांची ही प्रतिक्रिया आली आहे. मोदी म्हणाले होते की, नागरिकता कायदा आणि एनआरसी कायद्याचा भारतीय मुस्लीमांवर काहीही परिणाम होणार नाही. तसेच एनआरसीचा कुठेही उल्लेख झाला नसून हा कायदा संपूर्ण देशात लागू होणार नसल्याचे ते म्हणाले होते. तर संसदेत अमित शाह यांनीच एनआरसी संपूर्ण देशात लागू करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे देशात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
याआधी देखील चौधरी यांनी मोदी आणि शाह यांना घुसखोर म्हटले होते. आता दोघांना रामू-श्यामू संबोधले आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.