केंद्र सरकारविरोधात काँग्रेस नेत्यांचे देशात दौरे; पी. चिदंबरम येणार पुण्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 08:32 PM2020-01-27T20:32:22+5:302020-01-27T20:42:50+5:30
केंद्र सरकारने घेतलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा, नागरिकत्व नोंदणी कायदा दुरूस्ती या तसेच कामगार हित विरोधी धोरणे व अन्य बदलांमुळे नागरिकांमधील असंतोष वाढतो.
पुणे : केंद्रातील भारतीय जनता पार्टीप्रणित सरकारच्या विरोधातील मुद्दे देशात सर्वत्र पोहचवण्यासाठी काँग्रेसने केंद्रीय नेत्यांना देशाच्या विविध भागात जाऊन मुद्द्यांवर आधारीत लोकजागरण करण्याचे आदेश दिले आहेत. माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्यापासून ते राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापर्यंतच्या नेत्यांचा समावेश या पथकामध्ये आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा, नागरिकत्व नोंदणी कायदा दुरूस्ती या तसेच कामगार हित विरोधी धोरणे व अन्य बदलांमुळे नागरिकांमधील असंतोष वाढतो आहे, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ते भरकटल्यासारखे झाले आहेत. त्यामुळे आंदोलने होऊनही त्याचा राजकीय उपयोग होत नाही असा निष्कर्ष पक्षश्रेष्ठींनी केलेल्या सर्वेक्षणातून निघाला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ७ फेब्रुवारीला पुण्यात पी. चिंदबरम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सूत्रांनी सांगितले, की पक्षाच्या स्थानिक शाखा भाजपा विरोधातील मुद्दे प्रभावीपणे मांडू शकत नाहीत. त्यामुळेच केंद्रीय नेत्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन पक्षाच्या स्थानिक शाखांना मार्गदर्शन करावे, लहान सभा घ्याव्यात तसेच समाजातील विविध घटकांबरोबर संवाद साधावा, असे आदेश पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहेत. त्यासाठी एक स्वतंत्र पथक त्यांनी तयार केले असून पक्षाच्या केंद्रीय शाखेने त्यांच्या दौऱ्यांचा कार्यक्रम निश्चित करून दिला आहे. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, अभिषेक मनू सिंघवी, पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते व मिडिया, कम्यनिकेशन कक्षाचे केंद्रीय प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला, गुलाम नबी आझाद, माजी व्यापार मंत्री आनंद शर्मा व अन्य काही केंद्रीय नेत्यांचा या पथकात समावेश आहे.