नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022) संसदेत सादर केला. अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत मोदी सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे शून्य असल्याची टीका केली आहे.
राहुल गांधी अर्थसंकल्पावर टीका करणारे ट्विट केले आहे. अर्थसंकल्पात पगारदार कर्मचारी, मध्यम वर्ग, गरीब, शेतकरी, तरुण आणि छोट्या व्यावसायिकांसाठी काहीच नाही. मोदी सरकारचा यंदाचा अर्थसंकल्प केवळ शून्य आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
अर्थसंकल्पातून कुठलाही दिलासा मिळालेला नाही
देशातील कर्मचारी वर्ग, मध्यम वर्ग हा महागाई आणि कपातीमुळे चिंतेत आहे. पण अर्थसंकल्पातून त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा प्रत्यक्ष करासंबंधित पावलांनी या वर्गांना निराश केले आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलीय. सरकारने क्रिप्टोकरन्सीवरील रक्कमेवर ३० टक्के कर लावून क्रिप्टोकरन्सीला कायदा न करताच वैध ठरवले आहे का? असा सवालही सुरजेवाला यांनी केला आहे.
गरिबांसाठी यात काहीच नाही
यंदाचे केंद्रीय बजेट श्रीमंतांसाठीचे आहे. गरिबांसाठी यात काहीच नाही. क्रिप्टोकरन्सीवर सरकारने ३० टक्के कर जाहीर केला. पण क्रिप्टोकरन्सीचा कायदाच अस्तित्वात नाही. आणि त्याच्यावर कधी चर्चाही झाली नाही. हा अर्थसंकल्प सरकारच्या मित्रांना फायदा पोहोचवणारा आहे, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.
दिशाहिन असलेला हा अर्थसंकल्प
दिशाहिन असलेला हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी यात काहीच नाही. या बजेटमध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत काहीच म्हटलेले नाही. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाचाही उल्लेख नाही, असे म्हणत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी टीका केली आहे. तसेच महागाईमुळे त्रस्त असलेल्या गरीब, सामान्य आणि करदात्यांना अर्थसंकल्पातून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. तसंच समाजातील गरीब-श्रीमंतामधील वाढत असलेली दरी दूर करण्याचा प्रयत्न होईल, असं वाटत होतं. पण या अर्थसंकल्पातून कुणालाही दिलासा मिळालेला नाही. छोट्या उद्योगांनाही काही दिलेलं नाही, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केली आहे.