लोकसभेच्या उमेदवार निश्चितीला बसले; काँग्रेस नेत्यांनी एकमेकांना चोपले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 01:49 PM2019-03-08T13:49:14+5:302019-03-08T13:51:42+5:30
हरिद्वार लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसने बैठक बोलावली होती.
रुडकी : जिल्हा नियोजन बैठकीमध्ये झालेल्या भाजपाच्या नेत्यांमध्ये बूट-चप्पलाच्या देवाणघेवाणीवरून देशभरात चर्चा होत असताना आता उत्तराखंड काँग्रेस नेत्यांचे कारनामेही समोर आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार ठरविण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत नेत्यांनी एकमेकांनाच चोपल्याचा प्रकार घडला आहे. माजी मुख्यमंत्री 'हरीष रावत मुर्दाबाद' म्हटल्याने ठिणगी पेटल्याचे समजते.
हरिद्वार लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसने बैठक बोलावली होती. यासाठी माजी खासदार आणि निरिक्षक महिंद्र पाल सिंह यांना पाठविण्यात आले होते. या दरम्यान माजी मुख्यमंत्री हरीश रावत आणि माजी जिल्हाध्यक्ष डॉ. संजय पालीवाल यांच्या समर्थकांमध्ये तिकिट कोणाला द्यायचे यावरून वाद सुरु झाला. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तेवढ्यात पालिवाल यांच्या एका कार्यकर्त्याने 'हरीष रावत मुर्दाबाद' अशी आरोळी ठोकली आणि दोन्ही गट एकमेकांना भिडले. जवळपास अर्धातास हा गोंधळ सुरु होता. यानंतर वरिष्ठ नेत्यांनी मध्यस्थी करत वाद शांत केला.
इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु होत्या. प्रत्येकाला आतमध्ये बोलवले जात होते. खोलीच्या एका बाजुला रावत समर्थक तर दुसऱ्या बाजुला पालीवाल समर्थक उभे होते. ज्याच्या गटाच्या नेत्याला बोलावले जायचे त्याचा गट जोरदार घोषणाबाजी करायचा. हाणामारीवेळी माजी महापौर यशपाल राणा, डॉ. संजय पालीवाल आणि माजी राज्यमंत्री मनोहरलाल शर्मा यांनी मध्यस्थी केली. काँग्रेसचे निरिक्षक सिंह यांनी केवळ बाचाबाची झाल्याचे सांगत मारामारीचे वृत्त फेटाळले.
स्थानिक आणि बाहेरचा वाद
काँग्रेसमध्ये लोकसभेच्या जागावाटपावेळी मतदारसंघाच्या बाहेरचे आणि स्थानिक कांग्रेसी असा वाद उफाळला आहे. एक गट रावत य़ांच्या उमेदवारीला विरोध करत आहे. या गटाने पालीवाल यांना तिकिट देण्याची मागणी केली आहे. यामुळे दोन्ही गटांमध्ये असंतोष उफाळला आहे.
10 जण इच्छुक
या बैठकीवेळी 10 जणांनी लोकसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापैकी 5 जणांनी आधीच दावा केला होता. निरिक्षक महेंद्र पाल सिंह यांनी कोणालाही तिकिट मिळाले तरी गटतट बाजुला ठेवून काँग्रेसला जिंकवण्यासाठी काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.