- एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमध्ये राजकीय चित्र बदलण्याच्या नितीशकुमार यांच्या प्रयत्नांमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्याच पुढाकाराने नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळाले, असे सूत्रांनी सांगितले.तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करावे, असा माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा आग्रह होता. त्यानंतर नितीशकुमार यांनी सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून मदत मागितली. आधी तर सोनिया गांधी यांनी इन्कार केला; परंतु नंतर नितीशकुमार यांनी अनेकवेळा विनंती केल्यावर बिहारमधील चित्र बदलले.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये राजकीय परिवर्तनाची पटकथा शिष्टाचार भेटीने लिहिली गेली. नितीशकुमार यांनी सोनिया गांधी यांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर राजकीय चर्चा केली व भाजपकडून येत असलेल्या दबावाचा उल्लेख केला. यावर सोनिया गांधी यांनी राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. राहुल यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी नितीशकुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यावर सोपविली. तेजस्वी यादव यांनी तत्काळ राहुल गांधी यांच्याशी संपर्क साधला.
राजकीय दिग्गज पाहातच राहिले
बिहारचे राजकीय चित्र बदलासाठी नितीशकुमार एवढे बहुमत घेऊ इच्छित होते की, भाजपने कोणत्याही स्थितीत सरकार पाडता कामा नये. नितीशकुमार हे जदयू, राजद, डावे पक्ष व काँग्रेस मिळून १६४ ची संख्या पूर्ण होईपर्यंत शांत राहिले व संधी मिळताच खेळी खेळली. याबाबत भाजपला खबरही लागू दिली नाही. संपूर्ण तयारी झाल्यावर आरसीपी सिंह यांचा मुद्दा पुढे करून नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडली व राजकीय दिग्गज पाहतच राहिले.