नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बोकाळलेल्या पंचतारांकित संस्कृतीमुळेच बिहारसहित अन्य ठिकाणी नुकत्याच झालेल्या निवडणुकांत पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला. नेत्यांचा कार्यकर्त्यांशी संपर्क उरलेला नाही, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी रविवारी केली.
आझाद म्हणाले की, नेते जोवर पंचतारांकित संस्कृतीचा त्याग करत नाहीत तोवर पक्ष विजयी होणे शक्य नाही. काँग्रेसच्या प्रत्येक स्तरावरील कार्यशैलीत बदल झाला तरच हा पक्ष अधिक मजबूत होईल. काँग्रेसच्या नेतृत्वात तसेच संघटनेत बदल करावेत अशी मागणी आझाद यांच्यासह काँग्रेसमधील २३ नेत्यांनी त्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना ऑगस्टमध्ये पत्र लिहून केली होती. त्यानंतर आझाद यांना सप्टेंबरमध्ये पक्षाच्या सरचिटणीस पदावरून हटविले होते. आझाद यांनी सांगितले की, गेल्या ७२ वर्षांमध्ये काँग्रेसची सध्याची अवस्था सर्वात केविलवाणी आहे. लोकसभेच्या गेल्या दोन कार्यकाळात काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळू शकलेले नाही. असे असूनही लडाख हिल कौन्सिलच्या निवडणुकांत काँग्रेसने ९ जागा जिंकल्या. हे अनपेक्षित यश होते.
गांधी कुटुंबीयांना दिली क्लीन चिट देशात कोरोना साथीमुळे गांधी कुटुंबीयांना मनाजोगते काम करता आले नाही. त्यामुळे मी त्यांना क्लिन चीट देतो. मात्र काँग्रेस नेतृत्वाकडे याआधी केलेल्या मागण्यांत आम्ही काहीही बदल केलेला नाही. त्यातील अनेक मागण्या पक्षनेतृत्वाने मान्य केल्या आहेत.