सिद्धूमुळे पंजाबमध्ये झाले काँग्रेसचे नुकसान, नेत्यांनी राहुल गांधींकडे केली तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 04:29 PM2019-05-21T16:29:35+5:302019-05-21T16:31:25+5:30
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे.
नवी दिल्ली - पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. दरम्यान नवज्योत सिंह सिद्धू आणि त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांची तक्रार आता काँग्रेसच्या दिल्ली दरबारापर्यंत पोहोचली आहे. सिद्धू आणि त्यांच्या पत्नीच्या वक्तव्यांच्या व्हिडीयो क्लीप पंजाबमधील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठवल्या आहेत. आता सिद्धूंबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राहुल गांधींवर सोडण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाब सरकारमधील कॅबिनेटमंत्री नवज्योत सिंह सिद्धू आणि त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांनी पंजाब काँग्रेस आणि कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यांच्या व्हिडीओ क्लीप पंजाब काँग्रेसने राहुल गांधीचे कार्यालय आणि पक्षश्रेष्ठींना पाठवल्या आहेत. अशाप्रकारची वक्तव्ये करून सिद्धू आणि त्यांच्या पत्नीने लोकसभा निवडणुकीदरम्यान, पक्षाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याचा आरोप पंजाबमधील नेत्यांनी केला आहे.
नवज्योत सिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू या अमृतसर लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारीसाठी इच्छूक होत्या. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर नवज्योत कौर सिद्धू यांनी कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पक्ष प्रभारी आशा सिंह यांच्यावर तिकीट कापल्याचा आरोप केला होता. कॅप्टन साहेब आणि आशा कुमारी यांनी मॅडम सिद्धू लोकसभेच्या उमेदावारीसाठी योग्य वाटत नाहीत. दसऱ्या दिवशी झालेल्या ट्रेन दुर्घटनेच्या आधारावर माझे तिकीट कापले गेले, असा आरोप नवज्योत कौर सिद्धू यांनी केला होता.
अमरिंदर सिंह आमचे ज्युनियर कर्णधार आहेत. राहुल गांधी हे आमचे सिनियर कर्णधार आहेत. आपण पंजाबमधील 13 जागांवर काँग्रेसला विजय मिळवून देऊ शकतो, असे ज्युनिय कर्णधारांनी सांगितले होते. आता पंजाबमधील सर्व जागांवर विजय मिळवून देण्यात अपयशी ठरल्यास त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असेही नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटले होते. तसेच नवज्योत सिंह सिद्धू यांनी या वक्तव्याचे समर्थन केले होते.
चंदिगड लोकसभा मतदार संघातून नवजोत कौर यांच्यासह पवन बन्सल आणि मनीष तिवारी यांची नावे उमेदवार म्हणून चर्चेत होती. अखेर, चंदिगड मतदारसंघासाठी काँग्रेसकडून पवन बन्सल यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. अनेक महिन्यांपासून नवजोत कौर या चंदिगड मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा घेत होत्या. चंदिगड मतदार संघातून आपल्या काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात येईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलेल्या विधानावर पार्टी नाराज असून त्यामुळेच नवजोत कौर यांना उमेदवारी देण्यात आली नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. तेव्हापासून नवजोत कौर या पक्षावर नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि आशा कुमारी यांच्यावर हा आरोप केल्याचं बोललं जातंय.