नवी दिल्ली: माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात, असं काँग्रसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. माझ्या भाषणांमुळे काँग्रेसचं नुकसान होतं. त्यामुळेच मी रॅली आणि जनसभांना संबोधित करत नाही, असं सिंह म्हणाले. कधीकाळी काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे दिग्विजय सिंह दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष जीतू पटवारी यांच्या घरी गेले होते. तिथून निघताच अनेक कार्यकर्ते सिंह यांच्यासमोर गोळा झाले. या कार्यकर्त्यांशी दिग्विजय यांनी संवाद साधला. 'काम केलं नाहीत, तर फक्त स्वप्न बघत राहाल. असं केलंत, तर सरकार स्थापन करु शकणार नाही. तुमच्या शत्रूला तिकीट मिळालं, तरी त्याला निवडून आणा,' असं दिग्विजय सिंह यांनी म्हटलं. यानंतर दिग्विजय यांच्या मनातील खदखद बाहेर पडली. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसमध्ये दिग्विजय यांना साईडलाईन करण्यात आलं आहे. याबद्दल मनात असलेली नाराजी त्यांनी बोलून दाखवली. 'माझं फक्त एकच आहे. कोणताही प्रचार नाही. कोणतंही भाषण नाही. माझ्या भाषणामुळे तर काँग्रेसची मतं कमी होतात. त्यामुळे मी कुठे जातच नाही,' असं सिंह म्हणाले. राहुल गांधींनी तरुण नेत्यांना संधी दिल्यानं अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजीची भावना आहे. दिग्विजय सिंहदेखील याला अपवाद नाहीत. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी भोपाळला आले होते. त्यावेळी त्यांनी रोड शो केला होता. यावेळी लावण्यात आलेल्या बॅनरवर दिग्विजय सिंह यांचा फोटो नव्हता. त्यामुळे पक्षातील गटबाजी दिसून आली होती.
माझ्या भाषणांमुळे काँग्रेसची मतं कमी होतात- दिग्विजय सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 8:34 AM