नवी दिल्ली : इंडिया आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा निर्णय वेगाने घेतला जात आहे. २०१९ मध्ये काँग्रेसने लढवलेल्या जागांचे ‘बलिदान’ हे बऱ्याच अंशी त्याचे कारण आहे. यावरून काँग्रेसमध्ये काहीशी अंतर्गत नाराजी आहे, पण भाजपविरोधात लढण्यासाठी पक्षाकडे दुसरा पर्यायही नाही.
काँग्रेसने अधिक जागांवर निवडणूक लढवण्याचा मोह सोडला तरच ही आघाडी यशस्वी होऊ शकते, असे जाणकारांनी सांगितले. काँग्रेसने २०१९ मध्ये लढलेल्या जागा मित्रपक्षांना देण्यास सुरुवात करताच जागावाटप सोपे झाले आहे.
महाराष्ट्रात काय? - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८पैकी २५ जागांवर काँग्रेसने आपले उमेदवार उभे केले होते. - यावेळी शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि प्रकाशआंबेडकर यांच्या पक्षाशी युती झाल्यामुळे काँग्रेसला२५ जागा मिळणे कठीण आहे. - येथेही काँग्रेसला काही जागा सोडाव्या लागतील.
नेत्यांची समजूत काढावी लागणारकाँग्रेसने आपल्या जागा सोडण्याची तयारी दर्शविली असली तरीही तेथे लढाईच्या तयारीत असलेल्या नेत्यांची समजूत काढण्याचे आव्हान आहे. काही नेत्यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
कुठे होईल फायदा? तामिळनाडू आणि बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसला मित्रपक्षांपेक्षा एक ते दोन जास्त जागा मिळू शकतात. त्यामुळे तेथे फायदा होण्याची शक्यता आहे.
मित्रपक्षांना फायदाकाँग्रेसने २०१९ मध्ये ४२१ जागा लढवल्या, त्यापैकी फक्त ५२ जागा जिंकल्या होत्या. यामुळे भाजपचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी काँग्रेसला मतांचे विभाजन रोखण्याची रणनीती अवलंबावी लागली आहे.त्यामुळेच काँग्रेसने पक्षांशी आघाडी केली. काँग्रेसने मित्रपक्षांसह ६ राज्यांत १२६ जागांचे वाटप करत एकच उमेदवार उभा करण्याची घोषणा केली आहे.यात काँग्रेसने मित्रपक्षांसाठी ७० जागांचे ‘बलिदान’ दिले आहे. बिहार, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि झारखंडमधील १४० जागांसाठी एकच उमेदवार देण्यावरही लवकरच निर्णय होणार आहे.