Mallikarjun Kharge on Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवसाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांनी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकावर शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. लडाखमधील १९९९ च्या युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहताना पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. यावेळी कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदींनी दहशतवाद, जम्मू-काश्मीर, लडाख, अग्निपथ योजना आणि विरोध यावर भाष्य केले. कारगिलमध्ये पंतप्रधान मोदी यांनी अग्निवीर योजनेबाबत भाष्य केल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. कारगिल येथे केलेल्या भाषणावरुन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींवर नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. पंतप्रधान कारगिल विजय दिनानिमित्तही तोच खोटेपणा पसरवत असून क्षुद्र राजकारण करत आहेत, अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अग्निवीर योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी कारगिलमध्ये केलेल्या भाषणात अग्निवीर योजनेचा उल्लेख केला आणि विरोधकांवर निशाणा साधला.
"लष्करातील सुधारणांना आमचे पहिले प्राधान्य आहे. अग्निपथ योजना हा त्याचाच एक भाग आहे. अनेक दशकांपासून लष्कराला तरुण बनविण्यावर संसदेत चर्चा होत होती. अनेक समित्यांमध्ये हा विषय मांडण्यात आला, मात्र हा बदल करण्याची इच्छाशक्ती यापूर्वी दाखवली गेली नाही. पण सत्य हे आहे की अग्निपथ योजनेमुळे देशाची ताकद वाढेल आणि देशातील कर्तबगार तरुणही मातृभूमीच्या सेवेसाठी पुढे येतील. पेन्शनचे पैसे वाचवण्यासाठी सरकारने ही योजना आणली असल्याचा भ्रम विरोधक पसरवत आहेत. अशा लोकांच्या विचारांची मला लाज वाटते," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांच्या टीकेनंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. खरगे यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर याबाबत एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. कारगिल विजय दिनानिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारण करत आहेत, हे अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे, असं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे.
"आजवर कोणत्याही पंतप्रधानाने असे केले नाही. पंतप्रधान मोदी म्हणत आहेत की त्यांच्या सरकारने अग्निपथ योजना लष्कराच्या सांगण्यावरून राबवली हे पूर्णपणे खोटे आहे. याशिवाय हे आपल्या लष्करी दलांचाही अपमान करणारे आहे. माजी लष्करप्रमुख निवृत्त जनरल एमएम नरवणे यांनी रेकॉर्डवर म्हटले आहे की अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेले ७५ टक्के तरुण कायमस्वरूपी होतील. तर २५ टक्के चार वर्षांनंतर काढले जातील. पण मोदी सरकार नेमके उलटे करत आहे," असं खरगे म्हणाले.
"मोदी सरकारने तिन्ही सैन्य दलांसाठी अग्निपथ योजना सक्तीने लागू केली. एमएम नरवणे यांनी याबाबत एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी अग्निपथ योजना लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी हे धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. पण मोदी सरकार हे पुस्तक प्रकाशित करू देत नाहीये. केवळ सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन आपण व्यावसायिक सैनिक तयार करत आहोत का? सैनिक पैसे कमावण्यासाठी नव्हे तर देशभक्तीसाठी सैन्यात भरती होतात," असेही खरगे म्हणाले.