वाढती बेरोजगारी आणि कमी होत चाललेल्या नोकऱ्यांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नोकऱ्यांच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी पंतप्रधानांवर खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला आहे. खरगे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
"नरेंद्र मोदीजी, काल तुम्ही मुंबईमध्ये नोकऱ्या देण्यावरून खोट्याचं जाळं विणत होतात. नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी (NRA) ची घोषणा करताना तुम्ही काय बोलले होता त्याची मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देऊ इच्छितो. ऑगस्ट २०२० मध्ये तुम्ही म्हणाला होता की, NRA कोट्यवधी तरुणांसाठी वरदान ठरेल. सामान्य पात्रता चाचणीद्वारे, अनेक परीक्षा संपतील आणि मौल्यवान वेळ तसेच संसाधनांची बचत होईल. यामुळे पारदर्शकतेलाही मोठी चालना मिळेल" असं खरगे यांनी म्हटलं आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या पोस्टमध्ये तीन प्रश्न विचारले, ते पुढीलप्रमाणे, "NRA ने गेल्या ४ वर्षांपासून एकही परीक्षा का घेतली नाही? NRA ला १५१७.५७ कोटी निधी देऊनही चार वर्षात आतापर्यंत फक्त ५८ कोटी का खर्च केले गेले? NRA ही सरकारी नोकऱ्यांसाठी भरती करणारी संस्था होती. SC, ST, OBC आणि EWS तरुणांना त्यांच्या आरक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवता यावे म्हणून NRA जाणीवपूर्वक निष्क्रिय ठेवण्यात आले होते का?"
काँग्रेस अध्यक्ष खरगे पुढे म्हणाले की, "एनटीएमध्ये हेराफेरी झाली, पेपर फुटला आणि घोटाळा झाला आणि एनआरएने परीक्षाही घेतली नाही. असं का? शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी भाजपा-आरएसएसने घेतली आहे. आम्ही यापूर्वीही एनआरएचा मुद्दा उपस्थित केला होता, मात्र मोदी सरकार गप्प बसलं आहे."