Congress Mallikarjun Kharge News: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला चांगलाचा वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे देशातील अनेक भागात तापमान नवे उच्चांक गाठत असून, लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापल्याचे दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तीव्र होत आहेत. यातच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना, स्वतःच्या कामांकडे लक्ष द्यावे आणि त्यावर विचार करावा, असा खोचक टोला लगावला आहे.
मीडियाशी बोलताना खरगे म्हणाले की, जेव्हा तुमच्या जागा कमी होणार आहेत आणि आमच्या वाढणार आहेत अशा वेळी ४०० पारचा दावा विसरा, तो दावा योग्य नाही. ते सरकार बनवू शकत नाहीत आणि २०० जागांच्या पुढे जाणार नाहीत, असा दावा खरगे यांनी केला. तसेच भाजपाचे तामिळनाडू, केरळ आणि तेलंगणामध्ये अस्तित्व नाही. कर्नाटकात त्यांची स्थिती मजबूत नाही. महाराष्ट्रातही भाजपा कमकुवत आहेत. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये अटीतटीची लढत आहे. तर त्यांना ४०० जागा कशा मिळतील, अशी थेट विचारणा मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
४ जूननंतर स्वत:च्या कामाचा विचार केला पाहिजे
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर खरगे त्यांची नोकरी गमावतील, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली होती. यावर, राजकारणात नोकरीसाठी नाही, तर लहानपणापासून लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आलो आहे. इथे आता मला तेवढीच वर्षे झाली आहेत, जेवढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय आहे. ४ जूननंतर त्यांनी स्वत:च्या कामाचा विचार केला पाहिजे, असा पलटवार खरगे यांनी केला.
दरम्यान, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा कमी होणार आहेत, तर काँग्रेस आणि इंडिया आघाडीला फायदा होणार आहे, असा दावाही खरगे यांनी केला आहे.