“भले काँग्रेसला मत देऊ नका, पण चांगले काम केले असेल तर अंत्ययात्रेला नक्की या”: खरगे भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:00 PM2024-04-24T23:00:10+5:302024-04-24T23:00:21+5:30
Congress Mallikarjun Kharge News: भाजपा आणि संघ विचारसरणीला पराभूत करणे हेच ध्येय आहे. राजकारणातून कधी संन्यास घेणार नाही, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.
Congress Mallikarjun Kharge News: भलेही तुम्हाल काँग्रेसला मतदान करायचे नसेल. मात्र, तुमच्यासाठी जर मी काही चांगली कामे केली असतील, तर कमीत कमी माझ्या अंत्ययात्रेला नक्की या, असे अत्यंत भावूक उद्गार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काढले. मल्लिकार्जुन खरगे आपल्या गावी कलबुर्गी येथे गेले होते. या ठिकाणाहून मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई राधाकृष्ण डोड्डामणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
अफजलपूर येथील एका प्रचारसभेला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे अत्यंत भावूक झाल्याचे सांगितले जात आहे. तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले नाही, तर मला असे वाटले की, कलबुर्गी येथे आता मला कोणतेच स्थान राहिलेले नाही. मी तुमचा विश्वास जिंकू शकलो नाही. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या विचारसरणीला पराभूत करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात सक्रीय राहणार असल्याचा एल्गार मल्लिकार्जून खरगे यांनी केला.
राजकारणातून कधीही संन्यास घेणार नाही
निवडणुकीच्या रिंगणात असो किंवा नसो. या देशाचे संविधान वाचवण्यासाठी आणि देशाच्या लोकशाहीसाठी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहणार. राजकारणातून कधीही संन्यास घेणार नाही. एखाद्या पदावरून निवृत्ती घेतली जाऊ शकते. परंतु, आपली तत्त्वे आणि सिद्धांत यांपासून कधीही निवृत्ती घेता कामा नये. भाजपा आणि संघाच्या विचारधारेला पराभूत करण्यासाठीच राजकारणात आलो आहे. त्यांच्यासमोर झुकणार नाही, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी ठामपणे सांगितले. तसेच मी सिद्धरामय्या यांना वारंवार सांगतो की, तुम्ही मुख्यमंत्री किंवा आमदार म्हणून निवृत्त होऊ शकता. पण, जोपर्यंत तुम्ही भाजपा आणि आरएसएसच्या विचारसरणीचा पराभव करत नाही, तोपर्यंत तुम्ही राजकारणातून निवृत्त होऊ शकत नाही, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
दरम्यान, २००९ आणि २०१४ ची लोकसभा निवडणूक मल्लिकार्जुन खरगे याच कलबुर्गी येथून जिंकले होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत खरगे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. इंडिया आघाडीतील काही नेत्यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले मल्लिकार्जुन खरगे पंतप्रधानपदाचे चेहरे असावेत, असा प्रस्ताव मांडला होता. मात्र, तो प्रस्ताव अंतिम होऊ शकला नाही.