“दलित असल्याने संसदेत बोलू दिले जात नाही असे म्हटले तर चालेल का?”; खरगे संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 03:42 PM2023-12-20T15:42:51+5:302023-12-20T15:43:28+5:30
Parliament Winter Session 2023: विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली जात नाहीत. पंतप्रधानांनी संसदेवर बहिष्कार घातला आहे का, अशी विचारणा मल्लिकार्जुन खरगेंनी केली.
Parliament Winter Session 2023:संसद सुरक्षा त्रुटी आणि घुसखोरीवरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन निवेदन द्यावे, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेतून सुमारे १४१ खासदारांचे निलंबन करण्यात आले. तर, दुसरीकडे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप होत असून, हा मुद्दा आता जातीवर येऊन ठेपला आहे. यावरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संतप्त सवाल केला आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद परिसरात विरोधकांनी केलेल्या आंदोलनादरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. हा शेतकरी आणि जाट समुदायाचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया धनखड यांनी दिली. यानंतर आता हा मुद्दा जातीवर आल्याची चर्चा आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर भाष्य करताना टीका केली आहे.
दलित असल्याने संसदेत बोलू दिले जात नाही असे म्हटले तर चालेल का?
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, अनेकदा सभागृहात बोलण्याची संधी मला दिली जात नाही. दलित असल्यामुळे ही संधी नाकारली जाते, असे म्हटले तर चालेल का, जातीवरून समुदायाच्या भावना भडकवणे योग्य नाही. जी घटना सभागृहात घडली नाही. त्याबाबत सभागृहात प्रस्ताव पारित करणे योग्य नाही. पंतप्रधानांनी संसदेवर बहिष्कार घातला आहे का, सभागृहात येऊन विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. सभागृहात एखाद्या जातीवरून भाष्य करणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.
दरम्यान, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्ती जातीवरून बोलतात ही देशासाठी योग्य गोष्ट नाही. हा मुद्दा उपस्थित करून सरकार संसदेच्या सुरक्षेचा भंग करण्याच्या मुद्द्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. आता प्रत्येकाने आपली जात दर्शविणारा शिक्का लावून फिरायचे का, असा सवार अधीर रंजन चौधरी यांनी केला.