“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 07:43 IST2024-05-12T07:41:08+5:302024-05-12T07:43:35+5:30
देशातील बेकारी, महागाई या समस्या संपविणे मोदी सरकारला शक्य झालेले नाही. त्यामुळे जनता संतापलेली आहे, असा दावा करण्यात आला आहे.

“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप
पाटणा : तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करणे खूप अवघड आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कळून चुकले आहे. उद्धव ठाकरे व शरद पवार यांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी केला.
ते एका पत्रकार परिषदेत म्हणाले की, इंडिया आघाडी सोडून शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत यावे. त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील सभेत म्हटले होते. काँग्रेससोबत स्वत:ला राजकीयदृष्ट्या संपवून घेण्यापेक्षा आमच्यासोबत येणे केव्हाही चांगले, असे मोदी म्हणाले होते. मोदी यांचा करिष्मा आता संपलेला आहे.
देशातील बेकारी, महागाई या समस्या संपविणे मोदी सरकारला शक्य झालेले नाही. त्यामुळे जनता संतापलेली आहे, असा दावाही मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. मोदी हे हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, जनता आता फसणार नाही, असा दावा खरगे यांनी केला.