Congress Mallikarjun Kharge Parliament Budget Session 2024: देशभरात दर २ तासांनी एससी-एसटी समाजातील ५ लोक विविध गुन्ह्यांचे बळी ठरतात. पंतप्रधान मोदी प्रत्येक विषयावर बोलतात, पण मणिपूरच्या मुद्द्यावर काहीच बोलत नाहीत. सरकार नेहमीच ओबीसी आणि महिला आरक्षणाबाबत बोलत असते. मात्र, नुकतीच यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे असून, केंद्राने त्याविरोधात प्रतिज्ञापत्र का दिले, अशी विचारणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांनी राज्यसभेत बोलताना केली.
राज्यसभेत बोलताना मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. नेहरू स्मारकाचे नाव बदलण्याची काय गरज होती, अटलजी पंतप्रधान असताना त्यांनी नेहरूजींचा फोटो कुठे आहे, असे विचारले होते. त्यांनी नेहरूजींचा फोटो परत लावला. पण ही आजची भाजपा फोडाफोडीचे राजकारण करणारी आहे. केंद्र सरकार संसदेचे संरक्षण करण्यात अपयशी ठरत आहे. संसदेवरील हल्ल्यात पकडलेल्या आरोपींना विजेचे शॉक दिले जात आहेत. एका विशिष्ट पक्षाचे नाव घेण्यास भाग पाडले जात आहे, असे गंभीर आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केले.
तुमच्याकडे बहुमत आहे, आता काय यापुढे ४०० पारही कराल!!!
पुढे बोलताना मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, तुमच्या बहुमत आहे, आधी ३३०-३३४ जागा होते, आता यापुढे ४०० चा आकडाही पार कराल, असे विधान करताच, सभागृहात हशा पिकला. पंतप्रधान मोदी यांनाही हसू आवरता आले नाही. पुढे खरगे म्हणाले की, त्यांना आधी निवडून येऊ द्या, हे सर्व पंतप्रधान मोदींच्या कृपेने आले आहेत. समोरच्या बाकांवर बसलेले सदस्य PM मोदींच्या आशीर्वादाने आले आहेत. त्यांचे काम आता फक्त बेंच वाजवणे एवढेच राहिले आहे, असा खोचक टोला मल्लिकार्जुन खरगे यांनी लगावला.
दरम्यान, बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना हार का घालण्यात आले? पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हा मोहन भागवत त्यांच्यासोबत बसले होते. हे तेच मोहन भागवत आहेत, ज्यांनी एससी, एसटी आणि ओबीसींना दिलेल्या आरक्षणावर चर्चेची मागणी केली होती. पण, पंतप्रधान या प्रकरणी कधीच काही बोलले नाहीत, या शब्दांत खरगे यांनी हल्लाबोल केला.